दैनिक स्थैर्य | दि. 19 डिसेंबर 2024 | फलटण | महाराष्ट्रातील आकर्षक डाळिंब फळे पाहुन आनंदित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत अहिरेकर यांच्याशी चक्क मराठीत सुरुवात करुन दिलखुलास बातचीत केली. फळ उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिले.
माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या समवेत वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत अहिरेकर या तरुण, उत्साही, कष्टाळू शेतकऱ्याने नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेऊन त्यांना डाळिंब फळे भेट दिली.
राज्यातील फळबागा आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी केंद्र शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना आपल्या सोबत सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील कायम दुष्काळी अशी ओळख असलेल्या वाठार निंबाळकर येथील तरुण, कष्टाळू शेतकऱ्याची निवड करुन त्यांना आपल्या सोबत पंतप्रधानांच्या भेटी साठी नेले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीसाठी वेळ देवून खा. शरद पवार व चंद्रकांत अहिरेकर या शेतकऱ्याशी मनमोकळी चर्चा करताना त्याच्या व्यथा वेदना समजावून घेत त्यावर योग्य तोडगा काढण्याचे किंबहुना फळ उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्याचे स्पष्ट आश्वासन दिल्याचे चंद्रकांत अहिरेकर यांनी दूरध्वनीद्वारे सांगितले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सतत बदलते हवामान, फळ बागांवर होणारा रोग किडीचा प्रादुर्भाव, योग्य बाजार पेठ मिळण्यात येत असलेल्या अडचणी आणि त्यामुळे उत्पादन खर्चावर आधारित दर न मिळाल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा याबाबी खा. शरद पवार आणि चंद्रकांत अहिरेकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या समोर मांडून केंद्र शासनाने फळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रामुख्याने फळ निर्यातीसाठी योग्य सहकार्य व मार्गदर्शन करुन रास्त दर मिळण्यासाठी मदत करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
फलटण तालुक्यात अलीकडे फळ बागांखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत असून राज्य शासनाने फलटण तालुक्यातील धुमाळवाडी या छोट्या गावाला फळांचे गाव असा दर्जा देवून तेथील फळ उत्पादक शेतकऱ्यांना नवी ओळख निर्माण करुन दिली आहे.
फलटण तालुक्यात सुमारे १८७७ हेक्टर क्षेत्रावर फळबागा असून त्यामध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष, चिक्कू, पेरु, अंजीर वगैरे विविध फळ बागा आहेत. अलीकडे पिंक तैवान, पिंक गुजरात या पेरु बागा वाढत असताना योग्य बाजार पेठ नसल्याने रास्त दर मिळण्यात येत असलेल्या अडचणी एकीकडे तर दुसरीकडे फळ उत्पादन खर्चात होणारी वाढ दुसरीकडे अशा कात्रीत फळ उत्पादक शेतकरी सापडला असल्याचे दिसते.
खा. शरद पवार यांनी सुमारे २ वर्षांपूर्वी स्व. सुभाषराव शिंदे यांच्या समवेत चंद्रकांत अहिरेकर यांच्या वाठार निंबाळकर येथील डाळिंब बागेला भेट देवून पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त करीत त्याला योग्य मार्गदर्शन केले होते, त्यावेळे पासून चंद्रकांत अहिरेकर त्यांच्या संपर्कात असल्याने त्यांनी खास वेळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याशी अहिरेकर यांच्या सोबत भेट घेऊन फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या आहेत.