
दैनिक स्थैर्य । दि.०६ मार्च २०२२ । सातारा । लॉकउननंतर नियमित शाळा सुरू झालेल्या आहेत. यामुळे कमी वेळेत अधिक गुणवत्ताधारक शिक्षण देणे हे शिक्षकांपुढे आव्हान असताना शिक्षण विभागात विस्तार अधिकारी ते पदवीधर शिक्षकापर्यंतच्या पदोन्नत्या रखडल्याने अनेक पदे पाच ते सहा वर्षांपासून रिक्त असून, याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. तेव्हा शासनाने तातडीने पदोन्नत्या द्याव्यात अन्यथा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी १२ मार्च रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी केली आहे.
जिल्हा संघटनेच्या येथे झालेल्या बैठकीत यादव यांनी ही घोषणा केली. यावेळी जिल्हा शिक्षण समितीचे सदस्य नवनाथ भरगुडे, नारायण सपकाळ व शांताराम मासाळ, सुभाष ढालपे, विजय खांडके, शिवाजी शिवणकर, शहाजी यादव, दीपक गिरी, प्रदीप कुंभार, राजेंद्र जगताप, शशिकांत कांबळे, ज्ञानबा ढापरे, पी. जी. भरगुडे, विजय ढमाळ, दत्तात्रय पवार, महेंद्र जगाताप, शिक्षक बँकेचे संचालक आर. आर. पाटील, राजेंद्र मुळीक, संभाजी कदम, शहाजी जाधव, उद्देश गायकवाड, पोपट कासुर्डे, अशोक लिमण, अशोक पाटणे, नवनाथ काशीद आदी शिक्षक उपस्थित होते. यादव म्हणाले, ‘‘अनेक वेळा जिल्हा परिषद येथे चर्चा करूनही यातून काहीही हाती लागत नाही. तरी मुख्याध्यापक पदोन्नती स्थगितीबाबत लवकरच मार्ग काढावा. तसेच विस्तार अधिकारी, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख पदे लवकरात लवकर भरावीत व शैक्षणिक नुकसान टाळावे, अन्यथा १२ मार्चला संपूर्ण जिल्हाभर धरणे आंदोलन करणार आहे.’’ यात प्राथमिक शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे, आवाहनही यावेळी यादव यांनी केले.