
स्थैर्य, फलटण, दि. 11 सप्टेंबर : निरगुडी येथील प्राथमिक शिक्षक सचिन काकडे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. मात्र, त्यांचा मृत्यू हा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारवाईच्या धास्तीने आणि त्यामुळे आलेल्या प्रचंड मानसिक दडपणातून झाल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात आणि सामाजिक माध्यमांवर सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक सचिन काकडे हे जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या एका कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होते. सततच्या दडपणामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप शिक्षक वर्गातून केला जात आहे. या घटनेमुळे, “प्रशासकीय कारवाईच्या धसक्याने एखाद्याचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये गेल्या काही काळापासून शिक्षक बदली प्रक्रियेवरून वाद सुरू असल्याची माहिती आहे. काही शिक्षकांनी प्रशासनाच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. प्रशासनाकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आणि नोकरीवर गदा आणण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही काही शिक्षक संघटनांनी केला आहे. याच तणावपूर्ण वातावरणात शिक्षक काकडे यांचा मृत्यू झाल्याने, हा ‘व्यवस्थेने घेतलेला बळी’ असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नसली तरी, या घटनेमुळे प्रशासकीय कारवाईच्या पद्धतीवर आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.