स्थैर्य, फलटण, दि. २२ : करोना म्हणजेच कोव्हीड १९ च्या पूर्वी ज्या हाय रिस्क संपर्कामधील सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कोळकी येथील करोना बाधित मृत व्यक्तीच्या हाय रिस्क संपर्कातील ४ जणांचे स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठवलेले आहेत. व उरलेल्या हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींचे नमुने लवकरच घेऊन चाचणी साठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपूते यांनी कोळकी येथील अक्षत नगर परिसराची केली पहाणी व फलटण शहर व तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या.
फलटण उपविभागात होम क्वारंटाईन मध्ये 2887 व्यक्ती असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथील विलगीकरण कक्षामध्ये 12 व संस्थात्मक विलीगीकरणात 47 व्यक्ती आहेत, असेही फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.
कोळकी ता. फलटण येथील अक्षतनगर येथे शिक्षक दांपत्य असून संमंधीत महिला शिक्षिका ही मयत जेष्ठ नागरिकाची मुलगी आहे. सोमवार दि. १८ रोजी सकाळी साडे नउच्या सुमारास कुर्ला, मुंबई येथून भाड्याची गाडी करुन ते कोळकी येथे आले होते. परंतू त्याच दिवशी दुपारी साडे तीनच्या सुमारास मृत्यू झाला. सदर मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात असले, तरीही संबंधित मयत व्यक्ती ही मुंबई येथून आली असल्याच्या कारणामुळे मृत्यू पश्चातही सस्पेक्ट म्हणून त्या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला होता. बुधवार दि. २० रोजी रात्री उशीरा तो अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मिळाली व काही अवधीतच सोशल मिडियाद्वारे ही माहिती सर्वत्र वार्याच्या वेगाने पसरली. रात्री उशीरा अक्षत नगर येथे संमंधीताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, तालुका वैद्यकीय अधिकारी विक्रांत पोटे आदींसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी भेट दिली. या नंतर संमंधीत कुटूंबाच्या संपर्कात कोणी आलेले आहे का याची चौकशी केली, या माहितीतून संबंधीत मृत व्यक्तीच्या मुंबई येथील घरातील पत्नी, सून व नातवंडे यांना मुंबई येथे व कोळकी येथील दोन जावयांच्या घरातील सहा जणांना, गाडीचा ड्रायव्हर व एक शेजारी अशा हाय रिस्कमधील बारा जणांना शेती शाळा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तर लो रिस्क मधील कोळकी येथील एक व मुंबई येथील घराचे दोन शेजारी व अन्य कोण संपर्कात आले आहे का ? याची माहिती घेणे सुरु आहे.
कोळकी येथील कोरोनाबाधीत आढळून येण्यारा पहिलाच रुग्ण आसून या घटनेने अक्षत नगर, अजित नगर येथे भितीचे तर उर्वरीत कोळकी गावामध्ये चिंतेचे वातावरण आहे. गालवातील युवकांनी आपआपल्या भागातील रस्ते बंद करण्यास सुरुवात केली आहे तर आवश्यक वस्तू घरपोहोच दिल्या जातील, ग्रामस्थांनी घरा बाहेर पडू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.