दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । मुंबई । महाराष्ट्र विधानभवनातील सेंट्रल हॉल येथील मतदान केंद्रात आज राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठीची निवडणूक प्रक्रिया सायंकाळी ५ वाजता पूर्ण झाली. त्यानंतर मतपेटी (बॅलेट बॉक्स) आणि इतर आवश्यक निवडणूकविषयक साहित्य सीलबंद करुन ते सुरक्षेमध्ये वाहनाद्वारे सायंकाळी मुंबई विमानतळाकडे रवाना करण्यात आले. तेथून रात्री ९.५५ वाजताच्या विमानाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतपेटी दिल्लीकडे रवाना होईल.
यावेळी भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक अमित अग्रवाल, भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव एस. बी. जोशी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, विधिमंडळाचे उपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रुतुराज कुडतरकर, दोन्ही राजकीय पक्षाकडील पोलींग एजंट आमदार श्रीकांत भारतीय, आमदार डॉ. वजाहत मिर्जा अथर मिर्झा, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर आदी उपस्थित होते.