
पुणे – डॉ. अजितकुमार पटणायक यांना जलमित्र पुरस्कार प्रदान करताना माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू. शेजारी शेखर गायकवाड, डॉ. अरुणचंद्र पाठक, अनिल पाटील व सुनील जोशी.
स्थैर्य, पुणे, दि. 25 डिसेंबर : पक्षी, तलाव, जमीन आणि जंगल ही मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाची साधनं आहेत. त्यांच्यामुळे आपले जीवन समृद्ध होते. अलीकडे जंगल व तलाव नष्ट होऊ लागले आहेत, म्हणून त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या पर्यावरण, वाणिज्य व रेल्वे विभागाचे माजी मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी केले.
पुणे येथे महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे प्रतीवर्षी दिला जाणारा ‘जलमित्र’ पुरस्कार ओरिसा येथील चिलिका जलाशय प्राधिकरणाचे निवृत्त कार्यकारी अधिकारी डॉ. अजितकुमार पटणायक यांना डॉ. सुरेश प्रभू यांच्याहस्ते बुधवार (दि. 24) रोजी प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी यशदाचे महासंचालक शेखर गायकवाड (आयएएस), महाराष्ट्राच्या गॅझेटियर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. अरुणचंद्र पाठक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. प्रभू पुढे म्हणाले, की जैवविविधता जपल्याशिवाय मानवी जीवन सुखी होणार नाही. जेथे घनदाट जंगल आहे तेथे वाहते पाणी असते. त्याच्या साठवणूकसाठी मोठे तलाव निर्माण झाले आहेत. त्या पाण्यामुळे जैवविविधता जोपासली जाते. अशाच ठिकाणी जगाच्या कानकोपर्यातून पक्षी स्थलांतर करीत येत असतात. पक्षी हे जैवविविधतेचे परिपूर्ण लक्षण आहे. पक्षांमुळे पराग पोहोचविण्याचे काम होते. परागीकरणामुळे शेती पिकते, तेच अन्न माणसांना जगवते. आपल्या जीवनात जैवविविधता इतकी महत्वाची आहे. म्हणून पाणी, तलाव, जमीन आणि जंगल यांचं संरक्षण हे मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. विशेषतः पक्षांनी शतकानुशतके जैवविविधता जोपासली आहे. हे पक्षी जगवण्यासाठी भविष्यात आपल्याला मोठे काम उभे करावे लागेल. डॉ. अजितकुमार पटणायक यांनी ’चिलिका’ जलाशयाचे संरक्षण व संवर्धन करून भारतातील जलक्षेत्रात आदर्श काम निर्माण केले आहे. महाराष्ट्र विकास केंद्राने त्यांचा जलमित्र पुरस्कार देऊन गौरव केला, याचा खूप अभिमान वाटतो.
यावेळी डॉ. अजितकुमार पटणायक यांनी पुरस्काराबद्दल आभार व्यक्त करून जागतिक स्तरापासून गावाखेड्यापर्यंत पाण्याची स्थिती काय आहे हे उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. जंगल व जलसाठे यांचे संवर्धन करण्यासाठी समाजातील जाणत्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. भविष्यकाळ अतिशय बिकट असून जलक्षेत्रात भरीव, शास्वत काम करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन डॉ. पटणायक यांनी केले. यावेळी शेखर गायकवाड व डॉ. अरुणचंद्र पाठक यांचीही भाषणे झाली. महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. ह.भ.प. दत्ता मोरे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. महाराष्ट्र विकास केंद्राचे पदाधिकारी राजेंद्र शेलार, सुरेंद्र भोईटे, अजय शितोळे, सुनील जोशी, भारत माने यांनी विशेष योगदान दिले.
यावेळी निवृत्त सचिव दि. मा. मोरे, जलतज्ज्ञ डॉ.विजय परांजपे, अर्जुन पुरस्कार विजेते शांतारामबापू जाधव, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, डॉ.एस. ए. कुलकर्णी, प्रफुलचंद्र झपके, राजेंद्र माहुलकर, डॉ. दत्ता देशकर, प्रा. मोहन पाटील, मेजर बी.जी. पचारणे, डॉ. कमलकांत वडेलकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.प्रदीप कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
