आपल्या संस्कृतीत देवळे फार महत्वाची भूमिका पार पाडतात. आपणाला त्या ठिकाणी ऊर्जा मिळते. मन प्रसन्न होते. देवळातील देवाची पूजा अर्चा पुजारी गण करतात.स्वच्छता भक्ती भावाने केली जाते.त्यातून आपणाला सेवेचे फलित मिळते.
आपणाकडे पूर्वजांच्या समाधी , स्मारके, मुर्ती , पादुका पूजन केले जाते. त्यासाठी देऊळे बांधून भक्ती भावाने सेवा केली जाते. त्यात पूर्वजांनी केलेल्या तपाचे स्मरण असते. कालातरांने आपणाकडून त्या पूर्वज विभूतींच्या स्थळांची हेळसांड होते. देखभाल करण्यात कुचराई होते. दिव्या बत्ती अभावी , स्वच्छता अभावी झाडावेलींच साम्राज्य प्रस्थापित होते. पूर्वजांसाठी बांधलेली स्थळे कीडा मुंग्याने जनावरे यांनी दूरावस्थेत दिसून येतात. काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांची देखभाल करुन प्रेरणास्थळे निर्माण होतात. पण त्यांची संख्या नगण्य आहे. आपली श्रद्धा , भावभावना यांचा त्यात जरुर मिलाफ असतो. श्रद्धेला तडा जाता कामा नये. आपल्या पश्चात त्या प्रेरणा स्थळांची देखभाल होईलच हे सांगता येणार नाही. आत्ता तर जिवंत व्यक्तीच यातना भोगतात. तेव्हा जे पूर्वज पंचतत्वात विलीन झाले आहेत. त्यांना पुन्हा अडकून ठेवण्यात अर्थ नाही?
त्यापरीस आपल्या पूर्वजांनी दाखवलेल्या मार्गाने जावे. त्यांचे संस्कार, शिकवण, आचरण , मेहनत यांचा विसर न पडता. त्यांनी दाखविलेल्या दिशेने जाणं हे कैक पटीने सरस आहे. त्यांचे नांवे अन्नछत्र , वृक्षरोपण, रक्तदान, ज्ञानमंदीर उभारणी , पाणपोई, गरजूंना मदत , वाचनालय, व्याख्यानमाला, आरोग्य शिबीर, निराधरांना मदत , जीवसृष्टीची देखभाल, प्राणीमात्रांस चारापाणी, शैक्षणिक मदत , कीर्तन , प्रवचन सेवा अशी कितीतरी पद्धतीने आपणांला पूर्वजांचे नावलौकिक करता येईल. आपल्या मानसिकतेचा विचार आहे.भावनेपरीस कर्तव्याला महत्त्व देणं गरजेचे आहे.
आपल्या भावी पिढीला पूर्वजांचा इतिहास , पराक्रम , वैचारिक अधिष्ठान यांची ओळख करुन द्यावी . पूर्वजांच्या स्मृतीला आठवून आपल्या जीवनाची वाटचाल निश्चितच शाश्वत होणार. आपण आपल्या सामाजिक , धार्मिक , सांस्कृतिक परंपरेला सेवेचा वारसा देऊन हे कार्य शकतो. फक्त आपल्या विचारशिलतेत बद्दल घडला पाहिजे. आपल्या पूर्वजांची शक्तीस्थळांची विटबंना होण्यापरीस विसर्जीत करावी. कृतीतून त्यांना स्मरूया. विधीवत घरच्या घरी खर्च न करता मोकळ्या मनाने पूर्वजांना मोकळे करु या.