दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२२ । फलटण । फलटण शहर व तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. वादळ, वारे आणि धुवांधार पावसाने तालुक्याच्या पूर्व भागात आसू, हणमंतवाडी, मुंजवडी, गुणवरे भागात सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुरुवात केली.
गुणवरे येथे दि. ८ मे पासून ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा सुरु आहे. गेले २/३ दिवस यात्रेचे सर्व परंपरागत कार्यक्रम व्यवस्थित पार पडले असून आज यात्रेच्या अखेरच्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात आला आणि कुस्त्यांना सुरुवात झाली असतानाच वादळ, वारे आणि पावसाला सुरुवात झाल्याने कुस्ती शौकिनांच्या उत्साहाला मर्यादा आल्या.
दरम्यान फलटण शहर आणि परिसरात जोराचा पाऊस व वादळ वाऱ्याने मोठे नुकसान केले आहे. विशेषत: कोळकी परिसरात अधिक पाऊस झाला आहे. महाड – पंढरपूर राज्य महामार्गावर गोखळी पाटी, निंबळक नाका भागात प्रचंड वादळात झाडे पडली असून या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद पडली होती, काही वेळाने रस्ता खुला करुन वाहतूक सुरळीत झाली आहे.