
दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । सातारा ही स्वराज्याची जिवंत समाधी. तर राज्याभिषेकाचा साज असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगड हे तर स्वराज्याचे आराध्य अधिष्ठान. म्हणूनच शिवराज्याभिषेक दिनी निघणाऱया ‘राजधानी ते राजधानी’ या मोहिमेच्या दशकपूर्ती सोहळा व मंगल कलश पूजन समारंभाला मान्यवर व शिवभक्तांनी साताऱयाच्या शिवतीर्थावर अगत्य हजेरी लावली. मोहिमेची दशकपूर्ती आणि साताऱयात शिवराज्याभिषेक दिन सुरू झाला त्याला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याचा योगायोग साध्य झाला.
मंगल कलश पूजनाला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा, तहसिलदार आशा होळकर, बालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, शिवभक्त नंदकुमार सावंत, समाजसेवक राजू गोरे, नगरसेवक शेखर मोरे पाटील, पंचायत समिती सदस्य आशितोष चव्हाण, समाजसेवक फिरोज पठाण, ऍड नितीन शिंगटे, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, रवी पवार, रनर्स फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप काटे, जायट्सं ग्रुपचे अध्यक्ष रवीकांत गायकवाड, ऍड. अमित अंबिके, मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
राजधानी साताऱयाचा हा मंगल कलश शनिवारी सायंकाळी मार्गस्थ होणार असून राज्याभिषेकाच्या मध्यरात्री रायगडी दाखल होणार आहे. भल्या पहाटे राज्याभिषेक सोहळा साकारून परंपरेनुसार रायगडची माती सातारा जिह्यात विविध ठिकाणी पुजली जाणार आहे. राजधानी साताऱयात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याची प्रथा सुरू करणारे समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड व संस्थापक सचिव महेश पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. गेली 15 वर्ष साताऱयात शिवराज्याभिषेक दिन साजरा केल्यानंतर शिवराज्याभिषेक झालेली राजधानी रायगड आणि विद्यमान राजधानी सातारा यांच्यामध्ये दृढसंबंध निर्माण होण्यासाठी ‘राजधानी ते राजधानी’ या मोहिमेची आखणी करण्यात आली. त्यात गेल्या आठ वर्षांपासून राजधानी साताऱयातून राज्यभिषेकाचा मंगल कलश नेण्याची परंपरा निर्माण झाली.
शनिवारी प्रथेप्रमाणे सातारा-सांगली-कोल्हापूर या तीन जिह्यातील विविध नद्यांचे जल एकत्र करून मंगल कलश करण्यात आला. त्याचे पूजन राजधानी साताऱयातील युद्धसज्ज शिवमूर्ती समोर म्हणजेच शिवतीर्थावर विधिवत करण्यात आले. समितीचे अध्यक्ष दीपक प्रभावळकर यांनी उपस्थितांचा सन्मान केला तर समितीचे सहसचिव शेखर तोडकर यांनी आभार मानले. यावेळी शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीचे बाबासाहेब भंडारी, प्रवीण धुमाळ, अमोल शेंडे, सचिन जगताप, रणजित काळे, मुधोजी गायकवाड, गौरी धुमाळ, अभिजित रणदिवे, अभि सुर्वे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक सुनील मोरे यांनी केले.