पुराचा फटका बसणाऱ्या नागरी वस्त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव तयार करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ एप्रिल २०२३ । सांगली । सांगली जिल्ह्यात ज्या नागरी वस्त्यांना पुराचा फटका बसतो त्यांचे सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह सांगली येथे सांगली, कुपवाड, मिरज परिसर आणि सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे येत असलेल्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने पूरस्थिती रोखणे, कायमस्वरूपी उपाय शोधणे, संबंधित भागात पुरामुळे बाधित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन, योजनांची अंमलबजावणी या संदर्भात  जिल्ह्यातील  विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, समाज कल्याण सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

        सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील महापूराचा फटका बसणाऱ्या गावांचा आढावा घेवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सूचित केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेली शिष्यवृत्ती, जिल्ह्यातील ॲट्रॉसिटीची प्रकरणे, वृध्दाश्रम, आंतरजातीय विवाह प्रकरणी वाटप करण्यात आलेले अनुदान, सफाई कामगार, दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना यांची सविस्तर माहिती घेतली. याबरोबरच गेल्या काही दिवसापूर्वी कृष्णा नदीत मृत झालेले मासे व कृष्णा नदीचे वाढते प्रदूषण याबाबत करण्यात येत असणाऱ्या कारवाईचाही त्यांनी आढावा घेतला.

यावेळी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेमध्ये जिल्ह्यात 1 लाख 12 हजार 810 गॅस कनेक्शन देण्यात आले असून त्यापैकी 19 हजार 531 गॅस जोडण्या अनुसूचित जाती संवर्गाला तर 353 जोडण्या अनुसूचित जमातीतील संवर्गाला पुरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात सन 2016 पासून आत्तापर्यंत 21 हजार 872 घरकुले मंजूर असून त्यापैकी 15 हजार 308 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर 6 हजार 564 घरकुलांचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम 2013 ची महानगरपालिकेतर्फे अंमलबजावणी करण्यात येत असून अशा सफाई कामगारांच्या मृत्यूबाबत नुकसान भरपाई अदा करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सांगली महानगरपालिकेने दोन जणांच्या मृत्यू प्रकरणी प्रत्येकी 10 लाख रूपये असे 20 लाख रूपये अदा केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

वंचित घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीबाबत यावेळी केंद्रीस सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आढावा घेऊन सर्व शाळा, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे फॉर्म भरले जातील, शिष्यवृत्तीपासून कोणीही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले.  ॲट्रॉसिटी प्रकरणांचा आढावा घेऊन ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये संवेदनशिलपणे तपास होणे आवश्यक आहे. अनुसूचित जातीच्या लोकांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत याबाबत दक्षता घ्या, असेही त्यांनी निर्देशित केले.


Back to top button
Don`t copy text!