कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने पूर्वतयारी करा – पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नंदुरबार, दि.२२: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक पूर्वतयारी करावी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, लहान मुलांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा आतापासून निर्माण करा. म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करा. ग्रामीण भागातील लसीकरणाला गती देण्यात यावी. अनावश्यक  बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी.

बाजाराच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुर्गम भागात संसर्ग वाढणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. बँकेच्या बाहेर मंडपाची व्यवस्था करून शारीरिक अंतराचे पालन होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. खावटी अनुदान योजनेतील निधी वितरणाबाबत दैनंदिन आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लसीकरणासठी प्रशानातर्फे ग्रामीण भागात व्यापक जनजागृती तसेच शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वी मनरेगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना द्या

कोरोना संसर्ग कमी होत असताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना द्यावी,  असे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.

ॲड.पाडवी म्हणाले, बाहेरील राज्यातून परतलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावे. गाळ काढण्याची कामे, फळबाग, वृक्षारोपण अशी कामे घेण्यात यावी.  शेतीची कामे सुरू होईपर्यंत ग्रामीण भागात अधिक कामे सुरू करून रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न करावे.

वादळामुळे धडगाव आणि अक्कलकुवा भागात झालेल्या आंब्याच्या नुकसानीचा आढावा घ्यावा. खरीप हंगामात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी बी-बियाणांची अवैध विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. खतांची वेळेवर उपलब्धता होईल याची दक्षता घ्यावी. पीक कर्ज वाटपाच्या कामाला गती देण्यात यावी.

अक्कलकुवा तालुक्यात ठिबक सिंचन अनुदानाबाबत असलेल्या तक्रारीविषयी बँक आणि कृषि विभागाने चौकशी करावी. घरकुल योजनेबाबत तक्रारींची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. शबरी घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी उद्दिष्ट वाढवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी तळोदा तालुक्याच्या पश्चिम भागासाठी विजेची व्यवस्था आणि एकलव्य रेसिडेन्सी शाळेसाठी जागेबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीस विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!