दैनिक स्थैर्य । दि. ०२ मे २०२३ । सातारा । जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्याच्या विकासाबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा नियेाजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
वने, पर्यटन व स्थानिक नागरिक यांच्या सहभागातून पर्यटनात वाढ करावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, प्राथमिकता ठरवून त्याप्रमाणे मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेनुसार दोन वर्षाचा आराखडा तयार करावा. डोंगर उतारावर बांबूची लागवड करणे, विस्तारीत महाबळेश्वर पर्यटन क्षेत्र तापोळा भागात विकसित करणे, जलसंधारणाची कामे करणे, सिंचन विभागाकडील जुन्या बंधा-यांची मजबूतीकरण करणे, धरणातील गाळ काढणे व जलसाठ्यामध्ये वाढ करणे. डोंगरी भागात पाटाऐवजी पाईपलाईनने पाणी पुरवठा करणे, स्मार्ट प्राथमिक केंद्र, स्मार्ट शाळा, पर्यटन केंद्र या सर्वांचा विकास आराखड्यामध्ये समावेश असावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.