दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२३ । जळगाव । ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम मंगळवार, 27 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्पयात आली असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, प्रांताधिकारी महेश सुधाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी मुख्य स्टेज, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर लाभार्थ्यांची येण्या-जाण्याचे मार्ग, बैठक व्यवस्था, जिल्ह्यातील सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, रोजगार मेळावा, कृषि प्रदर्शन, आरोग्य शिबिर जागा, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदींची पाहणी करुन प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी श्री. मित्तल व पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांचेकडून जाणून घेतली.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगावचा जिल्हास्तरीय कार्यक्रम हा आतापर्यंतच्या कार्यक्रमांपेक्षा सरस होईल याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने नियोजन केलेले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी लाभार्थी कार्यक्रमस्थळी येतांना त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. विशेषत: वयोवृध्द लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी, लहान बालके, शालेय विद्यार्थी यांची विशेष काळजी घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्यात. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळावरील मार्गावर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थीत करण्याबाबतही त्यांनी सुचित केले.
35 हजार लाभार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन
जळगाव जिल्ह्यात शासन आपल्या दारी अभियान राबविण्यास 15 एप्रिल, 2023 पासून सुरुवात करण्यात आली असून शासनाच्या विविध विभागामार्फत जिल्ह्यातील 2 लाख 53 हजार 124 लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले आहे. त्यापैकी 35 हजार लाभार्थी कार्यक्रमास उपस्थित राहतील याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.
250 बस, 1 हजार चारचाकी तर 2100 दुचाकी वाहने पार्कीगची व्यवस्था
या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यक्रमास उपस्थित राहता यावे याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे गाव व तालुका पातळीवरुन वाहतुक व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळ व खाजगी 250 बसेस उपलब्ध करुन दिल्या आहे. तसेच 1 हजार चारचाकी तर 2100 पेक्षा अधिक दुचाकी वाहने जळगाव शहरात येतील असे गृहित धरुन एकलव्य क्रीडा संकुल, जी. एस. मैदान, नेरी नाका ट्रॅव्हल्स पॉईन्ट, सागर पार्क, खानदेश सेट्रल मॉल याठिकाणी वाहने पार्किगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर एसटी वर्कशॉप, ब्रुक बॅण्ड कॉलनी, रिंगरोड याठिकाणी राखीव पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे.
कार्यक्रमस्थळी आरोग्य शिबिराचे आयोजन
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्यास्थळी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जून रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात मुख्यत्वे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह या रुग्णांची तपासणी ककरण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पुढील उपचार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शिबिरात रुग्णांच्या आवश्यक त्या सर्व रक्त तपासणी चाचण्या मोफत करण्यात येणार आहे. शिवाय इतर आजार जसे सिकलसेल/थॅलेसेमिया/ मधुमेह/उच्च रक्तदाब/कॅन्सर/मानसिक आजार यांची तज्ञ डॉक्टर कडून तपासणी, समुपदेशन व उपचार करण्यात येणार आहे.
या शिबिरात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभर्थ्यांना गोल्डन कार्ड व आयुष्मान भारत हेल्थ कार्ड योजनेसंदर्भातील लाभार्थी यांना माहिती व कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी यांनी आधार कार्डसोबत नोंदविलेला मोबाईल क्रमांक व आधार कार्ड तसेच रेशन कार्ड सोबत आणावे. याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असल्याने ज्या रक्तदात्यांना स्वयस्फुर्तीने रक्तदान करावयाचे आहे त्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमस्थळी शासनाच्या विविध विभागांच्या 25 स्टॉलची उभारणी
शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हा पोलिस कवायत मैदान येथे मंगळवार 27 जून, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता शासनाच्या विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात येणार आहे. याठिकाणी नागरीक व लाभार्थी यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
या ठिकाणी कृषी विभाग, जळगाव शहर महानगरपालिका, आदिवासी विकास विकास, भूमि अभिलेख, क्रीडा विभाग, जिल्हा परिषद, आधार केंद्र, लीड बैंक, जिल्हा उद्योग केंद्र, वन विभाग, पशु संवर्धन विभाग, समाज कल्याण, नगर विकास, मत्स्य विकास, महसूल, जिल्हा महिला व बाल विकास, शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, हिरकणी कक्ष, आरोग्य तपासणी कक्ष व मा. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष याप्रमाणे विविध विभागांचे 25 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी येणाऱ्या नागरीकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
रोजगार मेळाव्यासाठी विविध कंपन्यांनी कळविली 2241 रिक्तपदांची माहिती
शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 27 जून, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता नुतन मराठा महाविद्यालय येथे ऑफलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १० वी १२ वी सर्व पदवीधारक/आयटीआय सर्व ट्रेड/डिप्लोमा सर्व ट्रेड/बीई मेकॅनिकल/बीसीए/एमबीए/बीई/डी. फॉर्म/बी.फॉर्म/सर्व डिग्रीधारक उमेदवारांसाठी विविध खाजगी आस्थापनांनी २२४१ रिक्त पदे भरण्याचे कळविले आहे.
या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अॅप्लाय करावा. तसेच उमेदवारांनी नावनोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यात मुलाखतीसाठी हजर रहावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.