साताऱ्यात महाराष्ट्र केसरीची तयारी अंतिम टप्प्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । सातारा । छ. शाहू स्टेडियममध्ये ५ एप्रिल पासून रंगणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. संकुलामध्ये दोन मातीचे व तीन मॅटचे आखाडे वनविण्यात आले असून राज्यभरातील नऊशे मल्ल या आखाडयात मानाच्या गदेसाठी झुंजणार आहेत. कुस्तीपट्टू व प्रशिक्षक अशा एकूण अकराशे जणांसाठी क्रीडा संकुलामध्ये निवास व क्रीडा सुविधा उभारल्या जात आहेत.

सन 1963 साली सातार्‍यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत 365 मल्लांनी सहभाग घेतला होता. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले होते. मानाच्या कुस्तीसाठी एकही स्पर्धक नसल्याने कोणालाही मानाची गदा देण्यात आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र केसरीची लढत झालीच नव्हती. महाराष्ट्र केसरीसाठी स्पर्धक न आल्याने रद्द झालेली ही राज्यातील एकमेव स्पर्धा राहिली आहे. अशातच तब्बल 59 वर्षांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बहुमान जिल्ह्याला मिळाला आहे. दि. 5 ते 9 एप्रिलला जिल्हा क्रीडा संकुल येथे हि स्पर्धा पार पडणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व जिल्हा प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे. राज्यभरातून येणार्या 900 मल्ल, 100 पंच आणि टीम मॅनेजर असे एकूण 1100 मल्ल येणार आहेत. त्या मल्लांची निवास व्यवस्थसाठी रयत शिक्षण संस्थेची वसतिगृह शाळा, व शासकीय आयटीआय येथील वसतिगृह येथे करण्यात येणार आहे. तर आयटीआय येथे जेवण व्यवस्था करण्यात येणार आहे. तर स्पर्धेसाठी येणार्‍या पंच व अधिकार्‍यांची सोया हि जिल्हा क्रीडा संकुलातील वसतिगृहात करण्यात आली आहे. पाणी तसेच अन्य मूलभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. याशिवाय मैदानावरील सुविधांचासह 50 हजार प्रेक्षक बसणार्‍या ठिकाणची रंगरंगोटीसह अन्य आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाच्या कुस्ती मैदानावर पाच आखाडे असणार असून यात 2 मातीचे आखाडे तर 3 गादीचे मॅट दिसणार आहेत. या पाच मॅटवर कुस्त्या होणार आहेत. याशिवाय कोच, खेळाडू तसेच व्हीआयपी व्यक्ती बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय मल्ल तसेच कोच यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधाही मैदानावर उपलब्ध असणार आहे.

दरम्यान, 59 वर्षानंतर जिल्हयाला बहुमान मिळाला असल्याने हि स्पर्धा ऐतिहासिक व्हावी यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व जिल्हा प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजन सुरु आहे.महाराष्ट्र केसरीची गदा हि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!