दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२४ | फलटण |
प्रेमचंद यांनी वास्तववादी साहित्य लिहिले. सर्वसामान्य जनतेचे दु:ख, वेदना, जगण्यासाठी त्यांच्याकडून केला जाणारा संघर्ष यांचे सूक्ष्म अंकन त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येते. श्रमिक व शेतकरी वर्ग यांच्या जीवन संघर्षाचे वास्तव आपणाला त्यांच्या साहित्यामध्ये पाहावयास मिळते. अनेक समस्यांचे निराकरणदेखील प्रेमचंदाच्या साहित्यात दिसून येते. म्हणून प्रेमचंद यांचे साहित्य एकप्रकारे समाजाला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथील हिंदी विभागप्रमुख प्रा. अच्युत शिंदे यांनी केले.
३१ जुलै, २०२४ रोजी मुधोजी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदीचे प्रसिद्ध व लोकप्रिय साहित्यकार प्रेमचंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून प्रा. शिंदे उपस्थित होते. ‘प्रेमचंद : एक साहित्यिक’ या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की, प्रेमचंद यांचे साहित्य हिंदी भाषेपर्यंत मर्यादित नसून ते जागतिक स्तरावरती पोहचले आहे. जगातील विविध भाषांमध्ये त्यांच्या रचनांचा अनुवाद झाला आहे. प्रेमचंद एक यथार्थवादी लेखक होते. त्यांनी जे समाजामध्ये पाहिले, अनुभवले त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येते. म्हणूनच वर्तमानातदेखील त्यांचे साहित्य प्रासंगिक आहे. आपल्या व्याख्यानात प्रा. शिंदे यांनी प्रेमचंद यांच्या साहित्यातील अनेक उदाहरणे देऊन प्रेमचंद यांच्या साहित्यातील योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) पी. एच. कदम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये जीवनातील अभाव हा मनुष्यासाठी प्रेरणादायक असतो, असे सांगून प्रेमचंद यांचे साहित्य हे नवीन पिढीसाठी एक प्रकारे प्रेरणादायी असल्याचे म्हटले. मानवी जीवनाची खरी ओळख प्रेमचंद यांच्या साहित्यातून होते. म्हणून नवीन पिढीने प्रेमचंद यांचे साहित्य वाचले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय हिंदी विभागप्रमुख प्रो. (डॉ.) नितीन धवडे यांनी करून दिला, तर आभार डॉ. सविता नाईक निंबाळकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्र-संचालन प्रा. किरण सोनवलकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)