दैनिक स्थैर्य । दि.२० जानेवारी २०२२ । सातारा । साताऱ्यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला ३ महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात गेल्या आहेत तर डोक्यात दगड देखील मारल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत.
मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वन रक्षक सानप यांना मारहाण केली आहे. या घटनेची गंभीर दखल वनविभागाने घेतली असून मारहाण करणाऱ्या सरपंचाच्या या कृत्याविषयी विलक्षण संताप व्यक्त होत आहे . जखमी महिलेला उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . या मारहाणीच्या निषेधार्थ सातारा वनरक्षक व मजूर संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे . सातारा तालुका पोलीस ठाणे येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.