प्रगत शिक्षण संस्थेच्या वतीने माण तालुक्यामधील प्रकल्पाबाहेरील अंगणवाडी सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । फलटण । प्रगत शिक्षण संस्था फलटण पंचायत समिती माण व एच.टी पारेख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकारच्या निपुण भारत कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या घटकांवर आधारित माण तालुक्यातील ५० अंगणवाड्यांसोबत ‘शैक्षणिक अखंडतेसाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील पूल’ या प्रकल्पांतर्गत शैक्षणिक काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत माण तालुक्यातील 50 अंगणवाडी मधील सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षण, ECE Kit, शैक्षणिक अभ्यास दौरे, ग्रंथालयातील पुस्तके, सर्व प्रकारची स्टेशनरी, प्रशिक्षित प्रकल्प सहाय्यकांच्या अंगणवाडी भेटी, विद्यार्थ्यांच्या पालकांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण, विद्यार्थी मूल्यमापन, तज्ञ मार्गदर्शक व साधन व्यक्तींच्या नियमित भेटी अशा विविध गोष्टी प्रकल्पांतर्गत केल्या जात आहेत. प्रकल्प यशस्वी राबवण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक व भाषा तज्ञ म्हणून डॉ.मंजिरी निंबकर, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे माण तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी भारत कोळेकर, सर्व पर्यवेक्षिका, बालवाडीच्या मुख्याध्यापिका समीरा कुरेशी, प्रकल्प समन्वयक प्रकाश अनभुले यांचे मार्गदर्शन मिळत आहे. प्रकल्प अधिकारी सोमिनाथ घोरपडे, विशाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली प्रकल्प सहाय्यक राहुल मुळीक, कोमल बोराटे, माधुरी भोसले, शितल भिसे व श्रद्धा जगदाळे काम पाहत आहे.

प्रगत शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने व बाल विकास प्रकल्प अधिकारी भारत कोळेकर व पर्यवेक्षिका श्रीम. इनामदार मॅडम, प्रकल्प अधिकारी सोमिनाथ घोरपडे यांच्या सहकार्याने बोधे या ठिकाणी प्रकल्पाबाहेरील अंगणवाडीच्या सेविकांचे प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये साधन व्यक्ती म्हणून बोथे येथील अंगणवाडी क्र.१९ च्या सेविका सौ संगीता जगदाळे, प्रकल्प सहाय्यक राहुल मुळीक, कोमल बोराटे या यांनी अंगणवाडी मधील दैनंदिन कामकाज, सर्कल टाईम, ग्रंथालय पुस्तकांचा मुलांच्या भाषिक विकासासाठी उपयोग, मुक्त खेळाचे कोपरे, अंगणवाडीतील वेगवेगळ्या प्रकारचे डिस्प्ले, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे लेखन,स्वलिपी संकल्पना, अंकुरती साक्षरता संकल्पना, शैक्षणिक साहित्य निर्मिती यासह विविध मैदानावरील खेळ यांचे प्रशिक्षण सेविकांना दिले.१८ ते २४ या दरम्यान बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाअंतर्गत स्वाक्षरी मोहीम व प्रतिज्ञा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी बोथे गावच्या सरपंच शोभा अविनाश जगदाळे, ग्रामसेवक सतीश भोसले, ग्रामपंचायत सदस्य रोनक जगदाळे, रामदास जगदाळे,पुनम काटकर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच शोभा जगदाळे व ग्रामसेवक सतीश भोसले यांनी अंगणवाडीसाठी सर्व प्रकारचे साहित्य व मदत करण्याचे आश्वासन दिले. हे प्रशिक्षण व्यवस्थित पार पडण्यासाठी प्रगत शिक्षण संस्थेच्या प्रकल्प सहाय्यक कोमल बोराटे राहुल मुळीक, अंगणवाडी सेविका सौ.संगिता जगदाळे व मदतनीस,अनुसया कुंभार यांनी विशेष मेहनत घेतली.


Back to top button
Don`t copy text!