कोरोना लसीसाठी भारताकडून आगाऊ ऑर्डर


स्थैर्य, नवी दिल्ली, दि ३  : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ८२ लाखांच्या पुढे गेला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख २० हजारांपेक्षा अधिक आहे. देशातल्या तीन कंपन्या कोरोनावरील लसीसाठी संशोधन करत आहेत. आता भारतानं आपल्या उत्पादन क्षमतेचा वापर करत ६० कोटी लसींची आगाऊ मागणी नोंदवली आहे. याशिवाय भारताकडून १ अब्ज डोससाठी बातचीत सुरू आहे. बहुतांश लसीकरणांमध्ये लसीचे दोन डोस द्यावे लागतात. त्या अनुषंगानं भारतानं कोरोना लसींची मागणी नोंदवली आहे.

भारतानं नोंदवलेल्या लसींच्या डोसची आकडेवारी ग्लोबल अ‍ॅनालिसिस कंपनी अ‍ॅडव्हान्स मार्केट कमिटमेंट्सनं दिली आहे. अमेरिकेनंतर भारतानं कोरोना लसींची सर्वाधिक नोंदणी केली आहे. अमेरिकेनं आधी कोरोना लसींच्या ८१ कोटी डोसची नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी १.६ अब्ज डोससाठी बातचीत सुरू केली आहे. अमेरिका आणि भारताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

जगभरातील देशांनी कोरोना लसीसाठी केलेल्या नोंदणीची माहिती ड्यूक ग्लोबल हेल्थ इनोव्हेशनचे सहाय्यक संचालक (प्रोग्राम) एँड्रिया डी. टेलर यांनी दिली. ‘अमेरिकेनं सर्वाधिक ८१ कोटी डोसची आगाऊ नोंदणी केली आहे. सध्याच्या घडीला अमेरिका आणखी १ अब्ज डोससाठी बातचीत करत आहे. युरोपियन युनियननं ४० कोटींची आगाऊ नोंद केली आहे. याशिवाय १.५६ अब्ज डोससाठी बातचीत सुरू आहे. कॅनडानं आपल्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येला पुरेल इतक्या प्रमाणात डोसची नोंदणी केली आहे. त्यानंतर ब्रिटनचा क्रमांक लागतो,’ अशी माहिती टेलर यांनी दिली.

२० देशांनी स्पुटनिक-व्ही लसीसाठी आगाऊ नोंदणी केल्याची माहिती रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुकाश्को यांनी दिली. जगातल्या २० देशांनी कोट्यवधी डोसची ऑर्डर दिली आहे. यात अमेरिका आणि भारताचाही समावेश असल्याचं मुकाश्को यांनी सांगितलं. स्पुटनिक-व्ही लसीसाठी रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडानं मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्याचकडून लसीच्या उत्पादनासाठी मोठी गुंतवणूकही करण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!