कृष्णानगर येथे विजेचे आठ खांब कोसळले; करंजे येथे घराची भिंत कोसळली; सुमारे दहा लाखांचे नुकसान
स्थैर्य, सातारा, दि. 31 : रविवारी दुपारी सोसाट्याच्या वार्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने सातारा शहरासह उपनगराला झोडपून काढले. सुमारे वीस मिनिटे झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. सोसाट्याच्या वार्यामुळे कृष्णानगर, सातारा येथे रस्त्यावरच विजेचे 8 खांब कोसळले. करंजे येथे घराच्या भिंतीची पडझड झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयानजीक झाड उन्मळून पडले. गोडोली येथे शाळेवरील पत्रे उडाल्याची घटना घडली. या विविध घटनांमध्ये सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, वळिवाचा पाऊस पडल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेले काही महिने कडक ऊन पडत असल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. हवेमध्ये प्रचंड उष्णता असल्यामुळे एसी, कुलर, पंखे लावून नागरिक उष्णतेपासून आपला बचाव करत होते. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटत वळीव पावसाने हजेरी लावली. सुमारे वीस मिनिटे पाऊस पडत होता. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. पावसामुळे काही वेळ का होईना हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिक सुखावून गेले होते.
सोसाट्याच्या वार्यामुळे सातारा – कोरेगाव मार्गावर कृष्णानगर येथे वीज वितरण कंपनीनजीक मीनाक्षी हॉस्पिटल ते नाझिया कलेक्शन दरम्यान रस्त्यावरच विजेचे 8 खांब कोसळले. सुदैवाने या घटनेत हानी झाली नसली तरी वीज महामंडळाचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोल पडल्यानंतर लगेचच कृष्णानगर, संगमनगर, विकासनगर परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच वितरण कंपनीच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतुकीसाठी रस्ता बंद केला. शेजारीच असणार्या दुसर्या रस्त्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
शनी मंदिर सुरक्षित
कृष्णानगर येथील वीट भट्टीनजीक गेल्या अनेक वर्षापासून शनीचे मंदिर आहे. रस्त्याच्या कडेलाच हे मंदिर असल्यामुळे या ठिकाणी दर शनिवारी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या असतात. आज दुपारी सोसाट्याचा वारा आल्याने मंदिराच्या शेजारी असणारा पिंपळाचा महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळला. मात्र या घटनेमध्ये मंदिराचे कसलेही नुकसान झाले नाही. शनीचे मंदिर सुरक्षित राहिल्यामुळे भाविकांनी सुस्कारा सोडला.
करंजे येथे भिंत कोसळली, गोडोली येथे पत्रे उडाले
सोसाट्याच्या वार्यामुळे करंजे येथे भिंत कोसळल्याची घटना घडली तर गोडोली येथे शाळेवरील पत्रे वार्याने उडून गेले. येथेच दुचाकीवर झाड पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाड उन्मळून पडले. वार्यामुळे सदरबझार येथील के. बी. पी. इंजिनिअरिंग कॉलेज समोर रस्त्यावरच विद्युत तारा तुटून पडल्या होत्या.
मुलांनी लुटला भिजण्याचा आनंद
कोरोनामुळे गेले तीन महिने लहान मुलांना घराबाहेर पडता आले नाही. त्यांच्या खेळण्यावरही मर्यादा आल्यामुळे त्यांना घरातच बसावे लागत होते. आज दुपारी वळिवाच्या पावसाला सुरुवात होताच मुलांनी घराच्या अंगणात, टेरेसवर जाऊन पावसामध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला.
पाणी पुरवठ्यासंबंधी महत्त्वाचे निवेदन
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा यांचे कडून मिळालेल्या माहितीनुसार या पत्रकाद्वारे आपणास कळविण्यात येते कि , दिनांक 31/5/2020 व 1/ 6 /2020 12.45 दुपारी दरम्यान कॅम्प परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने झाड पडल्यामुळे व बॉम्बे रेस्टॉरंट ते माहुली येथे विद्युत पोल पडल्याचे कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे पाणी उपसा बंद करणेत आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा यांचे मार्फत प्राधिकरणे अधिकारी यांनी विद्युत मंडळाला कल्पना दिली आहे. कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेले आहे सदरचे काम अत्यंत अडचणीचे ठिकाणी असून काम पूर्ण होणेस काही तास लागणार आहेत परिणामी मजीप्रा कडील पाणी पुरवठा ग्राहकांना दिनांक 31/ 5 / 2020 दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे व 1/6/2020 रोजी सकाळ सत्रातील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी उपलब्थ पाणी काटकसरीने वापरावे व प्राधिकरणास सहकार्य करावे. असे निवेदन दिले आहे
दरम्यान, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेताच्या मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी वळिवाच्या पावसाकडे नजर लावून बसले होते. वळवाचा पाऊस असा शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे मानण्यात येते. आज पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.