सरडे गावचा सुपुत्र प्रविण जाधव याची ‘ऑलिंपिक’ स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.15 : जपानमधील टोकियो येथे 23 जुलै पासून सुरु होणार्‍या जागतिक ऑलंपिक स्पर्धेमधील ‘आर्चरी’ (तिरंदाजी) या क्रीडा प्रकारासाठी भारतीय संघात सरडे (ता.फलटण) गावचा सुपुत्र प्रविण रमेश जाधव याची निवड झाली आहे.

प्रविण जाधव हा मुळचा फलटण तालुक्यातील सरडे गावचा रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. या शाळेतील त्याचे शिक्षक विकास भुजबळ यांनी त्याच्याकडील कौशल्य ओळखून त्याला खेळासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर प्रविण अमरावती येथे ‘आर्चरी’ (धर्नुविद्या) चे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. नेमबाजीतील कौशल्यावर त्याची 2015 साली आंतरराष्ट्रीय ज्युनिअर कँपसाठी निवड झाली. यातूनच पुढे सन 2016 च्या आर्चरीच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय वरिष्ठ संघात प्रविणला संधी मिळाली आणि आता टोकियो येथे होत असलेल्या जागतिक ऑलंपिक स्पर्धेमध्ये भारतासाठी ‘पदका’चा अचूक वेध घेण्यासाठी प्रविण सज्ज झाला आहे.

या यशाबद्दल प्रविण जाधव सांगतो, ‘‘मी आज जे काही आहे ते तिरंदाजीमुळे आहे. मी जर खेळाकडे वळालो नसतो तर कदाचित आज मी कुठेतरी मजूर म्हणून काम करत असतो. ऑलंपिक स्पर्धेमध्ये देशासाठी पदक जिंकणे हेच माझे ध्येय आहे.’’

दरम्यान, प्रविण जाधवच्या या निवडीबद्दल त्याला फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातून ऑलंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त होत असून त्याला क्रीडा क्षेत्राकडे प्रवृत्त करणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक विकास भुजबळ व सौ.शुभांगी भुजबळ यांचेही अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!