
स्थैर्य, फलटण, दि. २ फेब्रुवारी : कोळकी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीने आपली पकड अधिकच घट्ट केली असून, विरोधकांना धक्क्यावर धक्का देण्याचे सत्र सुरूच आहे. मालोजीनगर (कोळकी) येथील श्रीमंत मारुती मंदिर गणेश उत्सव मंडळाचे तरुण आणि तडफदार पदाधिकारी प्रतीक हनुमंत थोरात यांनी आज ‘राजे गटा’ला जय महाराष्ट्र करत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, युवा नेते संजय देशमुख, मयूर देशपांडे, डेव्हिड वाकोडे यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
युवा शक्तीचा भाजपावर विश्वास प्रतीक थोरात यांच्यासारख्या सक्रिय युवा पदाधिकाऱ्याने भाजपात प्रवेश केल्यामुळे मालोजीनगर परिसरात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात होत असलेली विकासकामे आणि भाजपाचे उमेदवार जयकुमार शिंदे व विकास नाळे यांची स्वच्छ प्रतिमा पाहून आपण हा निर्णय घेतल्याचे प्रतीक थोरात यांनी यावेळी सांगितले.
नेत्यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन या पक्षप्रवेशावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतीक थोरात यांचे स्वागत करत, मालोजीनगर आणि कोळकी परिसरातील युवकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी सचिन रणवरे आणि संजय देशमुख यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोळकी जिल्हा परिषद गटात जयकुमार शिंदे यांच्या सात वर्षांच्या अनुभवाचा आणि विकास नाळे यांच्या जनसंपर्काचा फायदा निश्चितपणे होणार असून, विरोधकांचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे.
विरोधकांच्या गोटात अस्वस्थता एकीकडे गिरवीत ३०० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला असतानाच, आता मालोजीनगरमधून प्रतीक थोरात यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्याने सह्याद्री चिमणराव कदम आणि डॉ. अशोक नाळे यांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची ही विजयाची घोडदौड आता अधिक तीव्र झाली आहे.
या पक्षप्रवेशामुळे मालोजीनगर व कोळकी परिसरात कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, जयकुमार शिंदे व विकास नाळे यांच्या विजयासाठी युवा शक्ती एकवटली आहे.

