अश्वमेध ग्रंथालय व नगरवाचनालयाच्यावतीने सातार्‍यात रविवारी प्रतिभा गौरव साहित्य संमेलनाचे आयोजन


स्थैर्य, सातारा, दि. 10 सप्टेंबर : येथील अश्वमेध ग्रंथालय व नगरवाचनालयाच्या वतीने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी (ता. 14) समर्थ मंदिर चौकातील दैवज्ञ सांस्कृतिक हॉलमध्ये एकदिवसीय प्रतिभा गौरव साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याची माहिती स्वागत समिती अध्यक्ष प्रा. श्रीधर साळुंखे, कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतिभा गौरव साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. व. बा. बोधे, उद्घाटकपदी ज्योतिषाचार्य प्रा. रमणलाल शहा, स्वागताध्यक्षपदी नगरवाचनालयाचे विश्वस्त विजयकुमार क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर प्रा. बोधे यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रा. शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. दुसर्‍या सत्रात ’साहित्य संमेलनाकडून मराठी रसिकांच्या अपेक्षा’ हा परिसंवाद होणार आहे. यात राज्य मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक अंजली ढमाळ, शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, व्याख्याते निरंजन फरांदे, लेखक प्रा. अनिल बोधे, मुद्रक व प्रकाशक विशाल देशपांडे सहभागी होणार आहेत.

तिसर्‍या ‘गप्पा गोष्टी’ या सत्रात चित्रपट लेखक नितीन दीक्षित, अभिनेते मकरंद गोसावी, संवाद व पटकथा लेखक विशाल कदम सहभागी होणार असून, ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे संवादकाची भूमिका बजावणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नाट्य कलेची सलग 50 वर्षे सेवा केल्याबद्दल तुषार भद्रे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

चौथ्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन गझलकार वसंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यात प्रदीप कांबळे, चंद्रकांत कांबिरे, राहुल निकम, अ‍ॅड. अनिल गोडसे, ताराचंद आवळे, प्रा. युवराज खरात, आनंदा ननावरे, अश्विनी कोठावळे, विलास वरे, राजेंद्र घाडगे, कांता भोसले, अ‍ॅड. सरिता व्यवहारे, डॉ. आदिती काळमेख, नीलेश महिगावकर, प्रा. प्रकाश बोधे, सीमा मंगरुळे आदी कवी सहभागी होणार आहेत. पाचव्या शेवटच्या सत्रात प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानुगडे, नाटककार प्रा. दिलीप जगताप यांच्या हस्ते समारोप व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. हे संमेलन सर्वांच्यासाठी विनामूल्य असून, या संमेलनात जास्तीतजास्त साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन अश्वमेध वाचनालयाचे अध्यक्ष संस्थापक डॉ. रवींद्र भारती झुटिंग, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने वसंचालकांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!