ल्हासुर्णे येथे नारळ काढताना फांदी तुटल्याने प्रतिक भांडवले या १९ वर्षीय युवकाचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । कोरेगाव । ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील चिरका नावाच्या शिवारात शेतकरी प्रमोद सर्जेराव भिलारे यांच्या विहिरीजवळील नारळाच्या झाडावरुन नारळ तोडण्याच्या प्रयत्नात असलेला युवक प्रतिक लक्ष्मण भांडवले वय १९ हा फांदी तुटल्याने खाली पडला. विहिरीच्या कठड्यावर त्याचे डोके आपटले आणि तो थेट विहिरीत कोसळला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. रात्रभर शोध मोहीम राबविल्यानंतर मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता, तो कोरेगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास मित्र विशाल सुतार याच्यासमवेत तो चरका नावाच्या शिवारात शेतकरी प्रमोद सर्जेराव भिलारे यांच्या विहिरीजवळील नारळाच्या झाडावरचे नारळ काढण्यासाठी गेला होता. नारळ तोडत असताना, त्याने फांदी पकडली होती, मात्र फांदी अचानक तुटली आणि प्रतिक याचा तोल गेला, तो थेट विहिरीच्या कठड्यावर आदळला, त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली, त्यातच तो विहिरीत पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला.

विशाल सुतार याने ग्रामस्थांना माहिती दिली. पोलीस पाटील शिवाजी सावंत यांनी पोलीस ठाण्यास माहिती कळवली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला वेगवेगळ्या मार्गाने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हाती लागत नव्हता, अखेरीस भांडवले यांचे कोरेगावातील नातेवाईक चंद्रकांत सुतार यांनी मडपंप आणल्यानंतर विहिरीतून पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला. सकाळी ८.३० च्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पोलीस पाटील शिवाजी सावंत यांच्यासह सरपंच संतोष चव्हाण, उपसरपंच राजेंद्र मचिंदर, माजी सरपंच प्रशांत संकपाळ, विशाल सावंत, राजेंद्र जाधव, समाधान माने, अमोल कदम, संग्राम गायकवाड, तुषार सावंत, संदीप सुतार, सतीश चव्हाण, जयवंत माने, अनिल भांडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी अहोरात्र परिश्रम घेतले. अखेर सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर ल्हासुर्णे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपक रामचंद्र भांडवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक सचिन साळुंखे तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!