सातार्‍यात प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचालयातर्फे वाचन कट्ट्याचे आयोजन


स्थैर्य, 15 जानेवारी, सातारा : येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) वाचनालयाच्या वतीने वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी आणि वाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी ‘वाचन कट्टा’ हा सामूहिक वाचनाचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या रविवारी शहरातील एका नियोजित ठिकाणी या कट्ट्याचे आयोजन होणार असून, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या रविवारी (दि. 18) या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती नगरवाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी दिली.

अमित कुलकर्णी म्हणाले, “नगरवाचनालय ही संस्था 175 वे वर्ष साजरे करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत असून, 173 वर्षे वाचक नगरवाचनालयात येत आहे. आता त्याचबरोबर नगरवाचनालयही वाचकांपर्यंत जाईल असा हा उपक्रम या निमित्ताने राबविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाचकांची संख्या वाढावी आणि सोशल मीडियाच्या जमान्यात वाचनाची सवय अधिक वाढावी, यासाठी वाचन कट्टा’ या उपक्रमातून प्रयत्न केले जाणार आहेत, तसेच हा वाचन कट्टा सर्वांसाठी मुक्तही असणार आहे.”

या उपक्रमात दर महिन्याच्या तिसर्‍या रविवारी सकाळी नऊ वाजता एका ठिकाणी सातारा शहराच्या विविध भागांतील ठिकाणाचे नाव त्या त्या महिन्यात ठरविले जाणार आहे. जमून एखादी विशिष्ट संस्था किंवा गटाचे पदाधिकारी व सदस्य, तसेच काही विद्यार्थी पुस्तकाचे वाचन करतील अशी ही संकल्पना आहे. उपक्रमात सहभागी होणारा प्रत्येक जण सोबत एक पुस्तक आणेल व ठरलेल्या वेळात त्या पुस्तकाचे वाचन करेल. नगरवाचनालयाच्या सर्व पदाधिकार्‍यांसमवेत वाचन करण्यासाठी येणार्‍या नियोजित संस्थेचे सदस्य, तसेच विद्यार्थी

या उपक्रमात सहभागी होतील. उपक्रमाचा शुभारंभ येत्या रविवारी (दि. 18) राजवाड्याजवळील प्रतापसिंह उद्यानात होणार आहे. त्यादिवशी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि पालिकेचे अधिकारी या वाचनाच्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. त्यादिवशी सकाळी साडेआठ वाजता हे सर्व जण राजवाड्याजवळील गोलबागेत एकत्रित येतील. तिथे छत्रपती प्रतापसिंह महारांजाच्या पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर प्रतापसिंह उद्यानात या उपक्रमाचा प्रारंभ होईल. अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्यात सदरबझार, शाहूनगर, शाहूपुरी अशा विविध विभागांतील एका ठिकाणी टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!