दैनिक स्थैर्य | दि. ०८ नोव्हेंबर २०२१ | वाई | किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या सभोवताली डागडुजी करण्याची मागणी प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने निमंत्रक विजयताई भोसले, अध्यक्ष गणेश जाधव यांनी निवेदनाव्दारे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. उदय कबुले व वाई- खंडाळा- महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे.
मौजे किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आहे. सदरचा पुतळा सातारा जिल्हा परिषदेच्या अखात्यारित असून पुतळ्या सभोवतालची स्वच्छता ही दररोज जिल्हा परिषदेमार्फत केली जाते. सदर पुतळ्याच्या चौथ-यावरील अनेक ठिकाणच्या फरशा निसटलेल्या, फुटलेल्या आहेत. पुतळ्याशेजारी असलेला शिलालेखाची स्कर्टींग फरशी निसटून पडली आहे. पुतळ्याच्या परिसरांत येणारे शिवभक्त व पर्यटक ज्या ठिकाणी उभे राहून छत्रपतींना वंदन करतात, त्या चौथ-यावरील निसटलेल्या, तुटलेल्या फरशांची दुरूस्ती तसेच एकंदरीत पुतळा परिसरांत छोटी मोठी दुरूस्ती व सुशोभिकरणाची कामे करावी लागणार आहेत. प्रतापगडावर येणार पर्यटक व शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतात व तुटलेल्या, मोडलेल्या फरशांबाबत तसेच शिलालेखाच्या अवस्थेबद्दल पर्यटक व शिवप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत.
मागील दीड- दोन वर्षाच्या कालावधीत करोना प्रादुर्भाव असल्याने या परिसरांत शिवभक्त व पर्यटकांची गर्दी कमी होती. आता अलिकडेच महाराष्ट्र शासनाने सर्व ऐतिहासिक स्थळे, देवस्थाने, मंदिरे, पर्यटनस्थळे खुली केल्याने प्रतापगड परिसरांत दररोज मोठ्या प्रमाणात शिवभक्त व नागरीकांची गर्दी होत आहे. त्यामुळे सदर परिसराची प्राधान्याने व तात्काळ दुरूस्ती करून घेणे आवश्यक आहे. आपण याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मौजे प्रतापगड किल्ला परिसरांतील पूर्णाकृती पुतळा परिसरातील डागडुजीचे काम लवकर सुरू करावे व शिवभक्तांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.