तरडगाव ग्रामपंचायत उप सरपंच पदी प्रशांत गायकवाड यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तरडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी प्रशांत सुरेश गायकवाड यांची बहुमताने निवड झाली. निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबजी व गुलालाची उधळण करण्यात आली.

मावळते उपसरपंच प्रदीप गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदाच्या निवडीसाठी लोकनियुक्त सरपंच सौ. जयश्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत सत्ताधारी गटाकडून प्रशांत गायकवाड यांनी तर विरोधी गटाकडून विजया गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

त्यानंतर निवडीसाठी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये प्रशांत गायकवाड यांना १३ मते तर विरोधी उमेदवारास ३ मते मिळाल्याने प्रशांत गायकवाड यांची बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

निवडणूक अधिकारी म्हणून भरत कोळेकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी जी. एम. जाधव यांनी सहकार्य केले.
निवडीनंतर आ. दीपकराव चव्हाण, माजी सभापती वसंतराव गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. जयश्री चव्हाण, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष विजयकुमार शहा, मावळते उपसरपंच प्रदीप गायकवाड, ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य, रोहिदास गायकवाड, बाळासाहेब अडसूळ, राजेंद्र गायकवाड, मोहन अडसूळ, लक्ष्मणराव गायकवाड, वसंतराव अडसूळ,अंकुश कुलाळ आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे प्रशांत गायकवाड हे तरडगाव आणि परिसरात कार्यरत आहेत. वडील दिवंगत पत्रकार सुरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला छत्रपती साप्ताहिकाच्या माध्यमातून लेखन करीत सामाजिक क्षेत्राची त्यांना ओळख होत गेली. जनतेचे हित व प्रश्नाची जाणीव असल्याने ते राजकारण विरहित समाजकारण करीत आहेत. सूर्यतेज प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. चांगल्या कार्यात नेहमी सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत, पदामुळे जबाबदारी वाढली आहे. लवकरच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत आहे. ते मोठे आव्हान आहे. मिळालेल्या संधीचा उपयोग आगामी काळात गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेवून निस्वार्थी भावनेने करीन याची ग्वाही प्रशांत गायकवाड यांनी निवडीनंतर बोलताना दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!