
स्थैर्य, सातारा, दि. 19 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण 17 संवर्गातील 431 पदांसाठी 13 ते 15 जुलै 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात कराडच्या प्रसाद बसवेश्वर चौगुले यांनी 588 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर पोलीस उपअधीक्षक परीक्षेत चैतन्य वसंतराव कदम यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र शेळके हा विद्यार्थी मागासवर्गीयांमधून पहिला आला आहे. महिला वर्गवारीतून अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटील पहिली आली आहे.
राज्यसेवा परीक्षा-2019 ही 17 संवर्गातील 431 पदांसाठी घेण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी (40), पोलीस उपअधीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (31), सहाय्यक राज्यकर आयुक्त (12), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (21), सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (16), उद्योग उपसंचालक (6), तहसीलदार (77), उपशिक्षणाधिकारी (25), सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (3), कक्ष अधिकारी (16), सहाय्यक गट विकास अधिकारी (11), उपअधीक्षक भूमी अभिलेख (7), राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक (10), सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (1), उद्योग अधिकारी (26), सहाय्यक प्रकल्प अधिकारी (5), नायब तहसीलदार (113), अशा एकूण 431 पदांसाठी 17 फेब्रुवारी 2019 ला मुंबईसह अन्य 37 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेेकरता 3 लाख 60 हजार 990 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून 6 हजार 825 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. प्रस्तुत मुख्य परीक्षा 13 ते 15 जुलै 2019 रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली होती. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
मुख्य परीक्षेसाठी 6 हजार 825 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1 हजार 326 विद्यार्थी हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. आता त्यातल्या 420 जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनाचा अर्ज करायचा आहे त्यांनी निकालानंतर 10 दिवसांच्या आत ऑनलाइन फॉर्म भरावा, असेही आवाहन आयोगाने केले आहे. लॉकडाउन आणि कोरोना यामुळे निकाल कधी लागेल याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात शंका होती. मात्र एमपीएससीचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गेल्या वर्षी परीक्षा झाली होती. मात्र, निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अनेक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निकाल नुकताच जाहीर केला आहे.
सहाय्यक राज्यकर आयुक्त परीक्षेत गौरव मंगीलाल भालाघाटिया यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात अभिषेक दीपक कासोडे, सहायक संचालक, वित्त व लेखा विभागामध्ये ज्ञानराज गणपतराव पोळ यांनी यश मिळविले. उद्योग उपसंचालक संवर्गात आकाश राजाराम दहाडे तर तहसीलदार संवर्गात ज्ञानेश्वर माणिकराव काकडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. उपशिक्षणाधिकारी संवर्गात राम शहाजीराव फरतंडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संवर्गात विकास भारतराव बिरादार, कक्ष अधिकारी संवर्गात मुकुंदराव विटेकर मुकूल, सहायक गट विकास अधिकारी अक्षय रमेश भगत, उपअधीक्षक भूमी अभिलेख संवर्गात शिवराज उमेश जाधव, राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक अश्विनकुमार श्रीमंत माने, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क संवर्गात श्रीकांत पांडुरंग कोकोटे, उद्योग अधिकारी संवर्गात भालचंद्र तात्यासाहेब यादव, सहायक प्रकल्प अधिकारी संवर्गात विजय साहेबराव साळुखे, नायब तहसीलदार संवर्गात अभिजित कैलाससिंग हजारे यांनी यश मिळविले आहे.
कराडचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला
बनवडी (कराड) येथील प्रसाद चौगुले यांनी इंजिनिअरिंगची पदवी कराड येथील गव्हर्न्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून घेतली आहे. त्यांचे शालेय शिक्षण सातारा येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले आहे. त्यांचे वडील शहापूर औद्योगिक वसाहतीत ऑपरेटर म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. प्रसाद यांच्या निकालानंतर कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अनेकांनी अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी गर्दी केली होती
विशेष म्हणजे प्रसाद चौगुले यांनी 2017 मध्ये कराड येथील गव्हर्न्मेंट इंजिनियरिंग कॉलेज येथून इंजिनियरिंग झाल्यानंतर पुणे येथे कंपनीत नोकरीला लागला होता. मात्र आपण अधिकारीच व्हायचे असे मनात ठरवून त्याने 1 वर्ष नोकरी केल्यानंतर राजीनामा दिला आणि पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर एकाच वर्षात त्याने एमपीएससी परीक्षेत यश मिळवले असून तो राज्यात प्रथम आला आहे.
जिल्हा बँकेच्या सेवानिवृत्त शिपायाचा मुलगा बनला तहसीलदारपश्चिम महाराष्ट्रात अधिकार्याचं गाव म्हणून ओळख असणार्या माण तालुक्यातील पळशी गावातील विकास लक्ष्मण गंबरे यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. विकासचे वडील जिल्हा बँकेतील सेवानिवृत्त शिपाई आहेत. विकासने मंत्रालयीन कक्ष अधिकारी व विक्रीकर उपायुक्त या पदाला गवसणी घातली आहे. या यशाने पळशीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
विकास याचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा, म्हसवड (नं-1) येथे तर माध्यमिक शिक्षण सिद्धनाथ हायस्कूल तर यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, सातारा येथे बारावीचे शिक्षण झाले. त्यानंतर विद्यार्थीगृहाचे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे येथे मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. 2015 पासून त्याने अभ्यास सुरू केला. 2017 मध्ये पहिल्या प्रयत्नात विक्रीकर उपायुक्त पदाला गवसणी घातली. तद्नंतर 2018 मध्ये मंत्रालयीन कक्ष अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाली. त्याने अभ्यासावर भर देत जुलै 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि तहसीलदारपदाला गवसणी घातली आहे. सध्या विकास हा सातारा येथे विक्रीकर उपायुक्तपदावर कार्यरत आहे.
स्पर्धा परीक्षा देताना सातत्य ठेऊन कष्ट घेतल्यास यश हमखास मिळते तसेच या क्षेत्रात मोठ-मोठ्या संधी उपलब्ध असून तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे.
– विकास गंबरे, तहसीलदार.