स्थैर्य, मुंबई, दि.७: प्रणबदांनी राष्ट्रपतीपदाला न्याय दिलाच परंतु त्यांच्यावर सोपविलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली. अर्थ, संरक्षण, परराष्ट्र अशी महत्वाची खाती सांभाळली. यातूनच त्यांची क्षमता सिद्ध होते. प्रणबदांचे व्यक्तीमत्व बहुआयामी आणि सर्वांसाठी मार्गदर्शक होते. अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
विधानपरिषदेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माजी विधानपरिषद सदस्य सर्वश्री विजय मुडे, रामनाथ मोते, बलभीमराव देशमुख, युनुस हाजी जैनोद्दिन शेख, जयवंतराव ठाकरे तसेच कोरोना योद्ध्यांना व कोरोना काळात मृत्यु पावलेले नागरिक यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला. तो विधानपरिषदेत सहमत करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ.शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना श्री.पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळलेल्या निलंगेकर साहेबांचे निधन आपल्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य, मंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान कायम लक्षात राहणारे आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात त्यांनी योगदान दिले. त्यांचा स्वभाव संघर्षाचा होता. समाजासाठी लढणारे, संघर्ष करणारे नेतृत्व होते. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेले काम नेहमीच स्मरणात राहील.
सभागृहाचे माजी सदस्य विजय मुडे यांचेही नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण चळवळीत व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, असे श्री.पवार म्हणाले. शैक्षणिक विकास, विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नावर ते लढत राहीले. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी त्यांनी संघर्ष केला.
श्री.पवार म्हणाले, सभागृहाचे माजी सदस्य रामनाथ मोते यांच्या निधनाने साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेले, शिक्षण आणि शिक्षक चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व आपण गमावले आहे. सर्वसामान्यांपैकी व सामान्यांमध्ये रमणारे ते नेतृत्व होतं. मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या आमदारांपैकी ते होते. ते शिक्षक नेते असल्याने अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास होता. विधानपरिषदेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असायची. त्यांच्या निधनाने राज्यातील शिक्षण व शिक्षक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
सभागृहाचे माजी सदस्य बलभीमराव देशमुख यांच्याबद्दलही शोकभावना व्यक्त करताना श्री. पवार म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काटीसारख्या छोट्याशा गावात जन्म झालेल्या बी.एन. देशमुख साहेबांनी उच्च आणि सर्वोच्च अशा दोन्ही न्यायालयात वकीली केली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणूनही काम केले. ते विद्वान होते. व्यासंगी होते. कायद्याचे ज्ञान व सामाजिक प्रश्नांची जाण असलेले त्यांचे नेतृत्व होते. शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सभागृहात आणि न्यायालयाच्या माध्यमातून ते लढत राहिले.
श्री.पवार म्हणाले, सभागृहाचे माजी सदस्य युनुस हाजी जैनोद्दिन शेख यांचे तीन महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेतून झाली. शेख यांच्या निधनाने सामान्य जनतेचे प्रश्न तळमळीने सोडविणारा नेता हरपला आहे.
सभागृहाचे माजी सदस्य जयवंतराव ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करताना श्री.पवार म्हणाले, त्यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तीमत्व हरवले. नाशिकमधील साहित्य चळवळीशी ते जोडले गेले होते. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात केलेले काम कायम स्मरणात राहील.