
दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा शहरांमध्ये ओमायक्रोन विषाणूचा संसर्ग वाढत असताना सातारा पालिकेचे कोविड कक्ष प्रमुख प्रणव पवार यांचा मोबाईल सातत्याने स्विच ऑफ रहात असल्याने सातारकर वैतागले आहेत. नाकापेक्षा मोती जड असा पवार यांचा कारभार सुरू असल्याने पालिकेचा करोना नियंत्रण कक्ष अनियंत्रित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
प्रणव पवार हे नगरसेवकच काय मुख्याधिकाऱ्यांच्या सुद्धा फोन उचलेनासे झाल्याने करोना कक्ष प्रमुख नक्की करतात काय ? हा वादाचा मुद्दा बनला आहे. सातारा पालिकेच्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन आठवड्यात तब्बल 113 नागरिक परदेशातून आले आहेत. या नागरिकांची आरोग्य तपासणी आणि त्यांच्यावर देखरेख ही सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी आहे मात्र सध्या पालिकेच्या करोना कक्षामध्ये प्रणव पवार हे वन मॅन आर्मी असल्यामुळे नक्की काम काय चालते हे समजायला मार्ग नाही . हो बघतो, करतो, कळवितो, त्याच कामात आहेत अशी छापील उत्तरे देणारे प्रणव पवार मोबाईल फोन कामाच्या वेळी स्विच ऑफ का ठेवतात हे समजायला मात्र मार्ग नाही मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी एका बैठकीमध्ये दोन तीन वेळा त्यांना फोन लावून सुद्धा त्यांनी फोन उचलला नाही यामुळे सातारा सातारा शहरातील करोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती आहे पवार यांच्याकडे वृक्ष करोना कक्ष भांडार असे विविध चार्ज असल्यामुळे कोणत्याही कामाला धड ते न्याय देऊ शकत नाही कोणतेही काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचा त्यांचा स्वभाव नाही एकाच अधिकाऱ्याकडे इतक्या विभागाचा भार कशासाठी असा त्रस्त सवाल खुद्द नगरसेवक निशांत पाटील यांनी केला आहे कामगार युनियन च्या बैठकीत त्यांनी हा सवाल केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा त्याचे उत्तर देता आले नाही पवार यांच्याकडे वृक्ष विभागाचा सुद्धा चार्ज आहे शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व सार्वजनिक बागा सातारकरांचा साठी बंद करण्यात आल्या आहेत या बागेच्या प्रवेशद्वारावर कोविड प्रतिबंधक नियमावली लावणे गरजेचे असताना अद्यापही पवार यांनी त्याचे नियोजन केले नाही परिणामी मंगळवारी सदर बाजार येथील सुमित्राराजे उद्यानात नागरिक आणि सुरक्षारक्षक यांच्यात प्रचंड बाचाबाची झाली पालिकेचा हलगर्जीपणा जर नागरिकांना त्रासदायक ठरत असेल तर याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
सातारा पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे अनियंत्रित झाल्याची भीती व्यक्त होत आहे पदाधिकाऱ्यांच्या मुदती संपल्याने त्यांचे फारसे पालिकेत येणे होत नाही अशा घडामोडींवर अधिकारीच पालिकेत राज्य करीत आहेत काही अधिकारी स्वतःच्या तालात असल्यामुळे त्यांना सातारकरांच्या व्यथा लक्षात येईनाशा झाल्या आहेत . ज्यांना सातारा शहराशी देणे-घेणे नाही असे अधिकारी इथे हवेत कशाला असा संतप्त सवाल सातारकर करीत असतात एकीकडे सातारा शहरात तीन करोना केअर सेंटर उघडण्याचे नियोजन असताना दुसरीकडे सरकारी छापाचे नोकरशहा नागरिकांना मनस्ताप देण्याचे रितसर काम करीत आहे त्यामुळे बापट साहेब प्रणव पवार यांचा कारभार आवरा असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर ओढवली आहे.