
स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑक्टोबर : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरवडी गणातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राजे गटाकडून या गणात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता असतानाच, गटाचे प्रवक्ते, प्रसिद्ध निवेदक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद रणवरे (सर) यांच्या नावाची जनमानसात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
निंभोरे गावचे सुपुत्र असलेले प्रमोद रणवरे हे सातारा जिल्ह्यात एक प्रसिद्ध व्याख्याते आणि निवेदक म्हणून ओळखले जातात. ते उच्च शिक्षित असून सहकार क्षेत्रातही त्यांचे काम उत्तम आहे. आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्याच्या कार्यामुळे फलटण तालुक्यात त्यांचा तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठा चाहता वर्ग आहे.
रणवरे हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. गटाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे.
केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक कार्यातही रणवरे आघाडीवर असतात. विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचे प्रश्न असोत, तरुण-तरुणींच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा तहसील, प्रांत आणि इतर शासकीय कार्यालयांमधील लोकांची कामे असोत, ती सोडवण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करत असतात.
निर्मळ चारित्र्य, प्रभावी वक्तृत्व आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य हे त्यांचे प्रमुख गुण मानले जातात. सुरवडी गणातील गावोगावी त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. याच गुणांच्या जोरावर त्यांच्या उमेदवारीची चर्चा गटामध्ये सुरू झाली आहे.
रणवरे यांच्या उमेदवारीला विशेषतः महिला वर्गातून आणि सामान्य मतदारांकडून पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. एक उच्चशिक्षित, अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे राजे गट या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाला संधी देणार का, याकडे संपूर्ण सुरवडी गटाचे लक्ष लागले आहे.