दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२३ | सातारा |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सातारा शहराचा विजयादशमी उत्सव शनिवारी सायंकाळी न्यू इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसह्याद्री उद्योग समूहाचे संस्थापक ज्ञानेश्वर उर्फ भाई वांगडे आणि प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत मंडळ सदस्य श्री. प्रमोदराव कुलकर्णी तसेच सातारा जिल्हा संघचालक डॉ. सुभाष दर्भे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात ध्वजारोहणाने आणि संघ संस्थापक डॉ. हेडगेवार गुरूजी आणि श्री. छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनेने झाली. सातारा शहराच्या विविध भागातील शाखांमधील स्वयंसेवकांनी रूमाल-योग, दंड-योग, दंड आणि घोष इत्यादी प्रात्यक्षिके समोर सादर केली.
शिवसह्याद्री समूहाचे संस्थापक श्री. भाई वांगडे यांनी संघाच्या कार्यक्रमात प्रथमच आल्याचे सांगत संघाच्या देशभरातील कार्याचे कौतुक केले व ‘हिंदुत्व’ हा आपल्या सर्वांचा अभिमान आहे, असे सांगितले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. प्रमोद कुलकर्णी यांचे उद्बोधन झाले. विजयादशमी हा संघाच्या स्थापनेचा दिवस आहे. त्यामुळे संघाच्या वर्धापनदिनाच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देत संघाच्या वार्षिक उत्सवाचे महत्व त्यांनी विशद केले.
पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले, संघाला ९८ वर्षे पूर्ण होऊन आता संघ शताब्दीकडे वाटचाल करत आहे. संघाच्या विविध शाखांवर जे काही नियमित उपक्रम होतात, त्यातील काही गोष्टींचे सादरीकरण प्रात्यक्षिकांद्वारे करून सर्वसामान्य लोकांपर्यंत शाखेचे दर्शन घडवले जाते. डॉ. हेडगेवार यांची पार्श्वभूमी सांगून त्यांनी संघाच्या स्थापनेचा उद्देश सामान्य माणसाचे असामान्यत्व जागे करणे, स्वतःपासून सुरूवात करत राष्ट्राची ताकद वाढवणे, असा असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याच देशात मात्र हिंदूंचा ‘धर्म’ या शब्दाबद्दल गैरसमज होतो. कारण त्याचे सरसकट भाषांतर ‘आरेलिजियन’ असे केले जाते. ‘आरेलिजियन’ म्हणजे फक्त उपासना पंथ. पण धर्म ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. जेव्हा एखादा माणूस आलेल्या अतिथीला देव मानतो, दुसर्याचे हरवलेले पैसे परत देतो, कारण हे सगळं करणं हा त्याचा धर्म आहे, असे तो मानतो. तेव्हा तो कुठल्या पंथाची उपासना करतो, हे गौण असतं. सामान्य माणूस असे रोजच्या वागण्यात हिंदू धर्माचे आचरण करतो, पण शिक्षित माणूस मात्र चुकीच्या संकल्पनांचा बळी होऊन ह्याच धर्मापासून दूर जाऊ पाहतो. तेव्हा या आत्मविस्मृत समाजाला जागे करण्याची गरज निर्माण होते. याच कार्यासाठी संघाची स्थापना झाली आणि हा वारसा आपल्या सगळ्यांना पुढे न्यायचा आहे, असे सांगून त्यांनी भाषणाची सांगता केली.
सातारा शहर कार्यवाह श्रीधर कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने झाली.
दरम्यान, मंगळवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन संपन्न होणार आहे. यावर्षीचे संचलन शाहूनगर गोडोली भागात होणार असून त्याचा मार्ग शाहू चौक – एसटी कॉलनी – कामाठीपुरा – साईबाबा मंदिर – पालवी चौक – भैरवनाथ मंदिर – शाहू चौक असा असणार आहे. मार्गावर राहणार्या सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संचलन स्वागतासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन शहर सहकार्यवाह श्री. रवी गायकवाड यांनी केले आहे.