भरतनाट्यम नृत्यातून प्रज्ञाने साकारली वीर राणी लक्ष्मीबाई

मानसी सदामते यांचे आज कथ्थक नृत्य आणि लक्ष्मी राजगोपालन यांचे कर्नाटकीय शास्त्रीय गायन .


सातारा – भरतनाट्यम सादर करताना सौ.प्रज्ञा जाधव -कोळेकर. (छाया -अतुल देशपांडे,सातारा)

स्थैर्य, 10 फेब्रुवारी, सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात आयोजित केलेल्या महाशिवरात्री संगीत कार्यक्रमात आजचा कार्यक्रम खर्‍या अर्थाने कळस गाठणारा ठरला .संपूर्ण दोन तास केवळ रंगमंचावर सौ.प्रज्ञा जाधव -कोळेकर या एकाच नृत्यांगना कलाकाराने अतिशय बहारदार असे भरतनाट्यम ,त्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार विविध अभंग, भजने ,रचना ,गीतरामायण, हनुमान चालीसा यावर नृत्य करत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती कला मंदिराच्या रंगमंचावर गेली 35 वर्षे हा संगीत व नृत्य महोत्सव सुरू असताना प्रथमच प्रज्ञाने या रंगमंचावर नृत्यातून साकारली वीर राणी लक्ष्मीबाई व तिची यशोगाथा. ब्रिटिशांशी केलेली युद्ध आणि या सर्वाला तोंड देत तिने करून दाखवलेला विशेष पराक्रम याचे सुंदर वर्णन आपल्या नृत्य, पदलालित्य व अभिनयातून साकारताना इयत्ता चौथी पासून भरतनाट्यम नृत्य शिकणार्‍या प्रज्ञांनी उपस्थित प्रेक्षकांना खरोखरच अचंबीतच केले .

कार्यक्रमाची सुरुवात ..गणेश वंदना आणि गणेशकौतुकम .. सर्व देव नमस्कारने.. झाली.स्व.शांता शेळके यांची रचना असणार्‍या सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या आणि आशा भोसले यांचा आवाज असलेल्या भीमपलास रागातील ..जय शारदे वागेश्वरी..वर बहारदार नृत्य झाले. त्यानंतर ..राज् राजेश्वरी अष्टकात ..आंबा शांभवी.. सादर होऊन सुभद्राकुमारी चव्हाण यांचे रचना असलेल्या.. झाशी की राणी ..या वीर आणि लक्ष्मीच्या रचनेवर झालेले नृत्य खरोखरच कौतुकास पात्र ठरणारे होते. त्यानंतर आदितलातील स्वामी दयानंद सरस्वती यांचे रचना असणार्‍या …. वर नृत्य सादर होऊन मार्कंडेय ऋषींची कथा असणार्‍या मार्कंडेय स्तोत्रावर नृत्य सादर झाले .ज्येष्ठ गायिका स्वर्गीय एम. एस. सुब्बालक्ष्मी यांचे मालकंस रागातील ..पग घुंगरू.. हे मिरा बाई चे भजन सादर होत ,आदी तालातील ..कलिंगा नर्तन कृष्णा.. तिल्लाना..सादर झाला .संत तुलसीदासांच्या ..हनुमान चालीसा ..या रचनेवर बहारदार हनुमानाचे अभिनय दाखवणारे नृत्य सादर होऊन ,ग.दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या गीत रामायण या मराठी रचनांमध्ये ..राम जन्मला ग सखे.. सावळा ग रामचंद्र ..स्वयंवर झाले सीतेचे.. भक्त शबरी ..आणि ..त्रिवार जयजयकार.. होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अतुल देशपांडे यांनी केले होते .

कार्यक्रम प्रसंगी वासुदेव नायर,मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन, नारायण राव यांचे सह सातारा परिसरातील अनेक नृत्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रज्ञा जाधव -कोळेकर यांचा सत्कार मंदिराच्या वतीने सुहास शहाणे, सौ .शैलजा व सौ.उषा शानभाग यांच्या हस्ते करण्यात आला .याप्रसंगी मंदिराच्या आवारात विविध बाल कलाकारांनी आपली चित्रे रेखाटली .यामध्ये रेवती निकम. समीरा महामुनी .आराध्या जंगम .अनुराधा लोहार, अंकिता नलावडे, कल्याण राठोड, अनय पवार यांनी सहभाग घेतला होता.

बुधवार दि.11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मानसी सदामते यांचे कथ्थक नृत्य आणि लक्ष्मी राजगोपालन यांचे कर्नाटकीय शास्त्रीय गायन संपन्न होणार आहे. मानसी प्रकाश सदामते ह्यांच्या अध्यापनाखाली 500 पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी शास्त्रीय नृत्यप्रकार कथ्थक, निमशास्त्रीय, लोकनृत्य, इ नृत्यप्रकाराचे शिक्षण घेतले आहे.


Back to top button
Don`t copy text!