शिवराळ भाषा, जातीय द्वेषाविरोधात ६ नोव्हेंबरला सांगोल्यात ‘महाराष्ट्र उपोषण’


स्थैर्य, सांगोला, दि. ३० ऑक्टोबर : राज्यात वाढत चाललेली शिवराळ भाषा, जातीय द्वेष आणि असभ्य वर्तनाला आळा घालण्यासाठी स्वतंत्र आचारसंहिता लागू करावी, यासह १४ प्रमुख मागण्यांसाठी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम ६ नोव्हेंबर रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर ‘महाराष्ट्र उपोषण’ करणार आहेत.

राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप, जातीय द्वेष आणि भ्रष्टाचाराचा राज्याच्या प्रतिमेवर परिणाम होत असून, सुप्त अराजक परिस्थिती निर्माण झाली आहे, असे कदम यांनी शासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या उपोषणाला राज्यातील अनेक भजनी मंडळे, माजी सैनिक संघटना, विद्यार्थी, महिला संघटना आणि सेवाभावी संस्था पाठिंबा देणार आहेत. उपोषणाच्या ठिकाणी भजनी मंडळांतर्फे विठ्ठल नामाचा गजरही करण्यात येणार आहे.

या उपोषणातील प्रमुख मागण्यांमध्ये द्वेषपूर्ण व शिवराळ भाषेवर नियंत्रणासाठी स्वतंत्र आचारसंहिता जाहीर करणे, शासन व आंदोलक यांच्यात सुसंवादाची पद्धत निश्चित करणे, प्रसारमाध्यमांनीही स्वतःसाठी आचारसंहिता घोषित करणे आणि लोकप्रतिनिधींच्या असभ्य वर्तनावर उपाययोजना करणे यांचा समावेश आहे. तसेच, गावगुंड व झुंडशाहीला आळा घालण्यासाठी गृह विभागाने स्वतंत्र आदेश जारी करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या उपोषणासाठी राज्यातील सर्व पक्षातील व सर्व जाती-धर्मातील लोकांना निमंत्रित करण्यात आल्याचे कदम यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!