प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ३८ कोटी १८ लाख रुपयांचे प्रस्ताव मंजूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ एप्रिल २०२३ । सातारा । प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येते.   या योजनेंतर्गत सातारा  जिल्ह्यात २९१ शेतकरी लाभार्थ्यांना  योजनेचा लाभ देण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी १ हजार ३२५ लाभार्थी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी ८२१ अर्जदारांच्या प्रस्तावांवर प्रक्रीया सुरू आहे. २९१ जणांचे ३८ कोटी १८ लाख रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यापैकी २१ कोटी २७ लाख रुपये कर्ज वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत ज्या लाभार्थींनी अर्ज करून कागदपत्रे सादर केली नाहीत त्यांनी पूर्तता करावी. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांनी केले.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

सध्यस्थितीत खाण्याच्या प्रवृत्तीतील बदल,वेळेची कमतरता, व्यस्त जीवनशैली, स्वाद व आरोग्याबाबत जागरुकता इत्यादी कारणामुळे प्रक्रियायुक्त अन्नाला मागणी वाढली आहे. याचबरोबर नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादनांबरोबरच स्मार्ट फूड, मॅजीक फूड, तयार अन्न याकडेही शहरी खवय्यांचा कल वाढला आहे. त्यासोबतच भरपूर पोषण मूल्य असणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांचीही मागणी वाढत चालली आहे.

 शेतकऱ्यांसह ग्रामीण व शहरी भागातील स्वयं सहाय्यता गटातील   महिलांना सूक्ष्म अन्न प्रक्रीयेतून सन्मान व प्रतिष्ठा मिळू शकते. तथापि, स्वयं सहाय्यता गटांचे अन्न प्रक्रिया उद्योग असंघटीत असल्याने बऱ्याच उत्पादनांची सर्वोत्तम गुणवत्ता असूनही आकर्षक पॅकींग व ब्रँडिंग न झाल्यामुळे बाजारामध्ये टिकाव धरू शकत नाहीत. ही समस्या दूर करण्यासाठी आणि स्थानिक, सेंद्रीय व परंपरिक उत्पादनांना व स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना लागू करण्यात आली आहे. योजनेतून सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत लाभ दिला जातो.

योजनेतून लाभ दिला जाणारे लाभार्थी

वैयक्तिक लाभार्थी: प्रगतशील शेतकरी,नव उद्योजक,बेरोजगार युवक, वैयक्तिक मालकी/भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था,स्वयंसहाय्यता गट,एन.जी.ओ ,सहकारी  संस्था ,खाजगी कंपनी इ

गट लाभार्थी/सामाईक पायाभूत सुविधा  :    शेतकरी उत्पादक संस्था/ शेतकरी उत्पादक कंपनी,स्वयंसहाय्यता गट व त्यांचे फेडरेश ,सहकारी  संस्था ,शासकीय संस्था  इ.

समाविष्ठ उत्पादने :   नाशवंत फळपिके,कोरडवाहू पिके,भाजीपाला,अन्नधान्ये,तृणधान्ये,कडधान्ये,तेलबिया,मसाला पिके,गुळ इ.वर आधारित उत्पादने,दुध व पशु उत्पादने,सागरी उत्पादने ,मांस उत्पादने,वन उत्पादने इ.

योजनेंतर्गत घटक, लाभार्थी आणि आर्थिक मापदंड

१ .प्रशिक्षण :       योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने कर्जमंजूरीसाठी  बँकेकडे शिफारस केलेले वैयक्तिक

लाभार्थी (३  दिवस प्रशिक्षण), योजनेतून बीज भांडवल लाभ मिळालेले स्वयंसहाय्यता गटाचे लाभार्थी (१ दिवस प्रशिक्षण)

२. बीज भांडवल : ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातील स्वयंसहाय्यता गटातील सदस्य,गट,त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी खरेदी व खेळते भांडवल यासाठी प्रती सदस्य कमाल रक्कम रु ४०,००० /-व प्रती स्वयंसहाय्यता गट कमाल रक्कम रु.४,००,०००/-सहाय्य

३. वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग :  वैयक्तिक  मालकी/भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयं सहायता गट,अशासकीय संस्था, सहकारी संस्था खाजगी कंपनी यांना प्रकल्प किमतीच्या ३५% जास्तीत जास्त  १० लाख सहाय्य

४.सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना लाभ(सामाईक पायाभूत सुविधा) :   शेतकरी उत्पादक संस्था/ शेतकरी उत्पादक कंपनी,स्वयंसहाय्यता गट व त्यांचे फेडरेशन ,सहकारी  संस्था ,शासकीय संस्था  यांना प्रकल्प किमतीच्या ३५%, जास्तीत जास्त ३.०० कोटी सहाय्य

 ५ . मार्केटिंग व ब्रांडींग :   शेतकरी उत्पादक संस्था/ शेतकरी उत्पादक कंपनी,उत्पादक सहकारी ,स्वयंसहाय्यता गट व त्यांचे समूह किंवा SPV यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या ५०% सहाय्य,कमाल मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करणेत येईल.

वैयक्तिक लाभार्थी निवडीचे निकष

Ø  अर्जदाराचा उद्योगावर  मालकी अधिकार(प्रोप्रायटरी/ भागीदारी/प्रायव्हेट लि.) असावा.

Ø  अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे, एका कुटुंबातील एक व्यक्ती पात्र असेल.

Ø  सदर उद्योगाला औपचारिक दजा प्राप्त करून देण्याची तयारी असावी.

Ø  प्रकल्प किंमतीच्या किमान 10% लाभार्थी हिसा देनेची व बँक  कर्ज घेण्याची तयारी  असावी.

 

गट लाभार्थी निवडीचे निकष

Ø  अन्न प्रक्रिया उद्योग प्रक्रियेतील शेतकरी उत्पादक गट / कंपनी/स्वयंसहाय्यता गट/उत्पादक सहकारी  संस्थाना लाभ

Ø  प्रकल्प किंमतीच्या किमान 10% लाभार्थी हिसा देनेची व बँक  कर्ज घेण्याची तयारी  असावी.

 

अर्ज करण्याची  पद्धत

योजनेतून  https://pmfme.mofpi.gov.in या URL वरती  ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. Online मोबाइलवर  देखील अर्ज सादर करता येईल. त्यासाठी निवडलेल्या जिल्हा संसाधन व्यक्ती यांची  मदत घेता येईल.


Back to top button
Don`t copy text!