
स्थैर्य, आरडगाव, दि. २४ सप्टेंबर : “भगवान बुद्धांनी दिलेला धम्म हा न्याय, नीती व सदाचारावर आधारित असून, सुख, शांती आणि समाधान मिळवण्यासाठी धम्माचे विचार आत्मसात करून त्याचे आचरण करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पूज्य भंते काश्यप यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेच्या वतीने मौजे आरडगाव येथे आयोजित ‘वर्षावास प्रवचन’ मालिकेतील पंधरावे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
यावेळी विविध वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समता सैनिक दलाचे केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांनी समता सैनिक दल आणि महार रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देऊन चळवळ गतिमान करण्यासाठी दल सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी ‘चला बुद्ध विहारी’ ही संकल्पना गीताद्वारे मांडली, तर महासचिव आयु. बाबासाहेब जगताप यांनी ‘वर्षावास’ या संकल्पनेचे महत्त्व विषद केले.
तालुक्याचे मार्गदर्शक आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी आगामी जनगणनेबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने, आपण अवगत असलेल्या भाषांमध्ये ‘पाली’ भाषेची नोंद करावी. तसेच धर्माच्या रकान्यात ‘बौद्ध’ आणि जातीच्या ठिकाणी ‘महार’ असा उल्लेख करावा.”
या कार्यक्रमात बौद्ध धम्माचे अभ्यासक आयु. तुषार मोहिते यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाटप करण्यात आले. तसेच, भारतीय बौद्ध महासभेतर्फे संविधानाच्या उद्देशिकेचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भीमगौरव तरुण मंडळ, माता रमाई महिला मंडळ आणि पंचशील बुद्ध विहार समिती यांनी केले. यावेळी आरपीआयचे युवक अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, माजी सरपंच अजित भोईटे, पोलीस पाटील अमित भोईटे यांच्यासह विविध मान्यवर आणि उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे यांनी केले.