दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । फलटण । ‘‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे काम राज्याच्या कानाकोपर्यात सुरु आहे. भारतीय राजकीय घटनेची प्रस्ताविका हेच आमच्या पक्षाचे धोरण आहे. संविधानाची अंमलबजावणी करणे, घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे मुलभूत अधिकारांत रुपांतर करणे व भांडवली अर्थव्यवस्था नाकारुन पुन्हा एकदा लोकशाही समाजवादासह मिश्र अर्थव्यवस्था पुर्नजिवित करणे हे आमचे ध्येय राहणार आहे. यासाठी भारतीय संविधानाशी बांधिलकी मानणारे क्रांतिकारक तरुण तयार करणे आवश्यक असून लोकशाहीची मुल्ये, सामाजिक समता, आर्थिक समता, राजकीय समता यासाठी गोरगरीब समाजातील युवक – युवतींना योग्य कार्यक्रम देण्याची गरज आहे. त्याकरिता महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रात कार्यकर्ते, युवक व युवतींसाठी प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती’’, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या उपक्रमाअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, जुन्नर, भोसरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, अकलुज, करमाळा व सोलापूर अशा 10 ठिकाणी हे प्रबोधन शिबीर संपन्न होणार आहे. त्यानुसार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पुणे येथे ‘भारतीय समाजापुढील गरिबांची समस्या’ या विषयावर डॉ.भालचंद्र मुणगेकर, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी बारामती येथे ‘लोकशाही समाजवाद व आजची परिस्थिती’ या विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी, दिनांक 8 ऑक्टोबर रोजी जुन्नर येथे ‘राखीव जागा व संविधानापुढील आव्हाने’ या विषयावर प्रा.सुभाष वारे, दिनांक 9 ऑक्टोबर रोजी भोसरी येथे ‘अल्पसंख्यांक समाज व भारतीय राजकारण’ या विषयावर अभिजीत वैध, दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सातारा (जकातवाडी) येथे ‘लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर किशोर बेडकिहाळ, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे ‘दहशतवादाची संविधाना पुढील आव्हाने’ या विषयावर डॉ.गणेशदेवी, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सांगली येथे ‘ओबीसी समाजापुढील आव्हाने’ या विषयावर लता प्र.म., दिनांक 22 ऑक्टोबर रोजी अकलुज येथे ‘भारतीय समाजापुढील शैक्षणिक आव्हाने’ या विषयावर अॅड.विजयराव मोरे, दिनांक 23 ऑक्टोबर रोजी करमाळा येथे ‘दिल्ली येथील शेतकरी आंदोलन’ या विषयावर डॉ.मिलिंद आव्हाड, दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सोलापूर येथे ‘जातीयवादाचा भारतीय राजकारणावर परिणाम’ या विषयावर माजी खासदार हुसेन दलवाई मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रबोधन शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे सरचिटणीस नारायण जावलीकर (मो.9403683315) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहनही या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.