
स्थैर्य, सातारा, दि. 8 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांनी बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पुन्हा जोरदार मुसंडी मारण्यासाठी सरसावलेल्या राष्ट्रवादीच्या गळाला दोन नेते लागले आहेत. बहुचर्चित माणचे नेते प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणारआहेत. यापैकी सुनील माने समर्थकांसह पक्ष प्रवेशासाठी श्री. पवार यांचा येत्या रविवारी रहिमतपूरला कार्यक्रम घेतल्याचे खासदार नितीन पाटील यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हाध्यक्षच साथ सोडून जाणार असल्याने प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना धक्का बसणार
आहे.जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष पालिकेच्या निवडणुकीत आपली ताकद आजमविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी काही जण स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून, तर काही जण स्वबळाची ताकद यामध्ये लावणार आहेत. त्यासाठी राजकीय खल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातपक्ष प्रवेशाचे जोरदार वारे वाहू लागले आहे. काही जण सत्तेसोबत राहण्यासाठी तर काही जण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी प्रवेश करत आहेत. काही जण आगामी विधानसभेच्या निवडणुकीत होणार्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर आमदार होण्याची संधी मिळेल, या आशेने प्रवेश करत आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेला प्राधान्य दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दुभंगलेली ताकद पुन्हा वाढविण्यासाठी मदत आणि पुनर्वसनमंत्री पाटील आणि खासदार नितीन पाटील यांनी जिल्ह्यात बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. यामध्ये त्यांच्या गळाला जिल्ह्यातील अनेक नेते लागले आहेत. यामध्ये माणचे नेते प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा समावेश आहे. हे नेते लवकरच हातात घड्याळ बांधणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीची ताकद माण तालुक्यात वाढणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी हे प्रवेश महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. 2029 मध्ये होणार्या विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय होत असल्याचे सांगितले जात आहे. सुनील माने यांच्यामुळे रहिमतपूर पालिकेसह सह्याद्री कारखान्यातील काही संचालकांची ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे.

