सातारा जिल्ह्यात अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे वीजपुरवठा पूर्वपदावर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 04 : ‘निसर्ग’ वादळाच्या तडाख्याने विस्कळीत झालेल्या वीजयंत्रणेची अविश्रांत दुरुस्ती केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील वीजपुरवठ्याची स्थिती गुरुवारी (दि. 4) पूर्वपदावर आली आहे. दरम्यान काही ठिकाणी वीजयंत्रणा जमीनदोस्त झाल्याने तसेच मुसळधार पावसामुळे अडथळे येत असल्याने महाबळेश्वर, पाचगणी शहरांचा वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत पूर्ववत करण्यात येत आहे.

प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात महावितरणचे 45 उच्चदाब व 220 लघुदाब वीजखांब व त्यावरील तारा या वादळामुळे कोसळल्याने सर्व वर्गवारीतील सुमारे 2 लाख 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

सातारा जिल्ह्यात बुधवारी (दि. 3) सकाळी ‘निसर्ग’च्या वादळी वाऱ्यांनी व मुसळधार पावसाने वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला. यामध्ये जिल्ह्यातील 14 उपकेंद्र बंद पडले. तब्बल 139 वीजवाहिन्यांच्या वीजपुरवठा खंडित झाला. प्रामुख्याने सातारा शहर, औंध, वडूज, दहिवडी, खटाव तसेच वाई, महाबळेश्वर, पाचगणी आदी परिसरांमध्ये या वादळामुळे वीजयंत्रणेला मोठा फटका बसला. दुपारनंतर वादळ व पावसाचा जोर ओसरताच सर्वच भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर काम सुरु झाले. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता  सुनील पावडे यांनी तातडीने आढावा घेतला. वीजयंत्रणेचे जादा नुकसान झालेले आहे त्या भागात महावितरण व कंत्राटदारांचे आणखी कर्मचारी पाठविण्यात आले. प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. सुनीलकुमार माने यांच्यासह सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती कामे सुरु केली. यामध्ये बुधवारी बंद पडलेल्या 14 पैकी 14 उपकेंद्र तसेच 139 पैकी 128 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बुधवारी रात्री उशिरा सुरु करण्यात आला. त्यानंतर काही रोहित्र दुरुस्तीचे व वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम सुरु होते.

सातारा, फलटण व कराड तसेच वडूज, खटाव, औंध आदी भागातील वीजपुरवठा सुरु झाला. मात्र महाबळेश्वर, वाई आणि पाचगणी शहरे तसेच सह्याद्रीच्या खोऱ्यातील महावितरणचे तापोळा उपकेंद्राच्या परिसरात तब्बल 32 उच्चदाब व 125 लघुदाब वीजखांब व तारा जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. त्याभागात जादा कर्मचारी पाठवून देखील कोसळलेली मोठी झाडे व सतत पाऊस यांचा दुरुस्ती कामामध्ये अडथळा येत होता. यामध्ये गुरुवारी दुपारी वाई शहराचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. तसेच सायंकाळी उशिरापर्यंत महाबळेश्वर व पाचगणी शहरांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. डोंगराळ भागातील तापोळा उपकेंद्राचा देखील वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आले आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!