
दैनिक स्थैर्य । 24 एप्रिल 2025। फलटण । गोखळी, ता. फलटण येथे विजेचा लंपडाव सुरू आहे. या भागात सध्या यात्रा उत्सवांचा हंगाम सुरू आहे. परंतु याठिकाणी अनेक वेळा वीजपुरवठा खंडीत होत आहे. वीजेच्या लपंडावाने यात्रा उत्सवावर पाणी पडले.
फलटणच्या पूर्व भागात राजाळे, आसू, गुणवरे, धुळदेव, निंबळक, पिंपरद गावच्या यात्रा उत्सव सुरू आहे. आधीच कडक उन्हाळा त्याच वीजेच्या लपंडावाने नागरिक घामाघूम होत आहेत. वीज खंडीत होण्याबरोबरच कमी दाबाने वीज पुरवठा वारंवार होत असल्याने झेरॉक्स, इलेक्ट्रॉनिक पंखे,कुलर, मिक्सर, टिव्ही आदी विद्युत उपकरणे जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. उकाड्याने एैराण झालेली पाहुणे मंडळी यात्रांमधील घामाघूम होवूनच जेवणाचा आस्वाद घेत आहेत. या भागात आठवड्यातून एकदा मंगळवारी वीज पुरवठा दुरुस्ती साठी खंडीत केला जातो. परंतु सध्या रोजच वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना याबद्दल विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
वीज वितरण कंपनीच्या विरोधात या भागातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या भागात लग्न सराई हंगामाबरोबरच उन्हाळी कामे आहेत. त्यातच वीजेच्या कमी दाबामुळे विद्युत उपकरणे बंद पडल्याचा फटका नागरीकांना सहन करावा लागत आहे.. सध्या याठिकाणी 42-43 अंशापर्यत उन्हाचा पारा चढता आहे. कडक उन्हाळ्यामुळे येथील विहीरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. उपलब्ध पाण्यावर ऊस, कडवळ, मका तसेच डाळींब, पेरु या फळबागांना वेळेवर पाणी देण्याची गरज आहे. परंतु विजेच्या लपंडावामुळे जनावरांना, पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. शेतकर्यांना विजेच्या लपंडावामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे.