खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यास वीज वितरणच्या अधिकार्‍यांना यश


दैनिक स्थैर्य । 29 मे 2025। फलटण । अतिवृष्टीने फलटण शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. खंडीत वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठा, पीठ गिरणी तसेच घरगुती विद्युत उपकरणे बंद पडल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली होती, मात्र, वीज वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी तातडीने कार्यवाही करुन शहरातील वीज पुरवठा एक दिवसात पूर्ववत केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

अतिवृष्टीने फलटण शहर व तालुक्यात वीज वितरण कंपनीचे उच्च दाब वाहिनीचे 37, लघु दाब वाहिनीचे 129 खांब पडले होते. उच्च दाब वाहिनीच्या 17 गाळ्यातील, लघु दाब वाहिनीच्या 109 गाळ्यातील वीज वाहक तारा तुटल्या होत्या, 6 रोहित्र नादुरुस्त झाली होती, तर 1 रोहित्र पाण्यामध्ये वाहत गेले होते त्यामुळे साहजिकच संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने आपत्तीची तीव्रता अधिक वाढली होती.

वीज वितरण कंपनी फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. आर. लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय 1 अनिरुद्ध लिमकर, सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय 2 रविंद्र ननवरे, सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय 3 सुनील गौंड, सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय सोमंथळी लक्ष्मी माने यांनी अहोरात्र मेहनत घेऊन वीज वितरण कंपनीचे अन्य अधिकारी, कर्मचारी, कार्यालयातील 40 जनमित्र, एजन्सी कडून घेतलेले 40 कर्मचारी यांच्या मदतीने फलटण शहरातील खंडित वीज पुरवठा एक दिवसात सुरळीत करण्यात यश मिळविले.

बाणगंगा नदीच्या पुरामध्ये मलठण भागाला वीज पुरवठा करणारे खांब नदीत पडून वाहून गेले तर वीज वाहक केबल तुटून वाहुन गेल्याने त्या भागात वीज पुरवठा पूर्ववत करणे एक आव्हान होते, पण या अधिकारी, कर्मचार्‍यांनी तेथे ही दुसर्‍या दिवशी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले. वीज पुरवठा सुरळीत झाल्याने शहर वासियांसह प्रशासन यंत्रणेने वीज वितरण कंपनीचे विशेष आभार मानले आहेत.


Back to top button
Don`t copy text!