दैनिक स्थैर्य । दि. २८ जुन २०२१ । फलटण । शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून राजधीनी टॉवर्स ही ईमारत बांधली गेलेली आहे. ह्या ईमारातीमध्ये काही व्यावसायिकांच्या फायद्यासाठी नियमबाह्य बदल केल्याची तक्रार फलटण नगरपरिषदेमधील विरोधकांनी सत्ताधार्यांवर केलेले होते व त्या अनुषंगाने सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देवून उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला होता. त्या नुसार सातारचे सहाय्यक नगररचनाकार यांनी राजधानी टॉवर्समधील त्या बांधकामाच्या पुढील कामास स्थगिती दिलेली होती. परंतू ह्या मध्ये सत्ताधारी गटाने थेट नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला व या मध्ये नियमानुसारच नगरपरिषदेने बांधकाम केले असल्याबाबतची माहिती नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना दिली. त्यानुसार नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे नगरविकास विभागाच्या सचिवांना आदेश दिले व फलटण नगरपरिषदेच्या राजधानी टॉवर्समधील त्या बांधकामाच्या स्थगिती आदेशालाच स्थगिती दिली.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरामध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. विकासकामे करत असताना विकासकामांमध्ये खोडा घालण्याचे काम विरोधक नेहमीच करत असतात. फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्या राजधानी टॉवर्सच्या बाबतीत विरोधकांनी घेतलेली भुमिका ही अंत्यंत चुकीची व नागरिकांसह प्रशासनाची दिशाभूल करणारी होती. या बाबत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना नगरपरिषदेच्या वतीने सद्य परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानुसार नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी स्थगितीच्या आदेशालाच स्थगिती देण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले व त्यानुसार नगरविकास विभागाचे सचिव यांनी याबाबतचा आदेश पारित केलेला आहे. आगामी काळामध्ये विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहराचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग गुंजवटे यांनी या वेळी दिली.