सोनके येथे माजी जिल्हा परिषद सदस्य सतिश धुमाळ यांनी खोदलेल्या शेतातील पाणीसाठा. |
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. 2 : गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणारी व शेतकरी वर्गाच्या पसंतीस उतरलेली मागेल त्याला शेततळे या योजनेला कृषि विभागाने स्थगिती दिली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाकडून येणाऱ्या २०२०-२०२१ अर्थसंकल्पिय निधीत कपात केल्याने कृषी विभागाने नविन शेततळे आखणी व खोदकामास स्थगिती दिली आहे.
ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई काळात शेतीसह पिण्याचे पाणी व इतर वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागविण्यासाठी शेततळ्याची मदत होते. उपलब्ध पाण्याच्या जोरावर पिकांचे नियोजन करणे शक्य होत असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेच्या माध्यमातून शेततळी उभारली आहेत. शासनाच्या आर्थिक मदतीचा फायदा घेऊन शेततळ्यातील पाण्याचा वापर करून पाणी टंचाई काळातही उच्चांकी उत्पादन मिळविल्याच्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा आहेत. त्यासोबतच काही शेतकरी शेततळ्यात मत्सपालनाचा व्यवसाय करून दुहेरी फायदा घेत आहेत. चालू वर्षी देखिल या योजनेच्या माध्यमातून शेततळे उभारण्यासाठी इच्छुक असले तरी शासनाने या योजनेला स्थगिती दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान कोविड १९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनस्तरावरून विविध योजनांना स्थगिती देण्यात आल्याने शेती विकासाच्या बाबींना खीळ बसणार असून शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
दुष्काळी भागात शेततळ्यातील पाण्याच्या आधारावर शेतकऱ्यांना वार्षिक पिकांचे नियोजन करता येते. त्याचबरोबर शेततळ्यात शेतकरी शेतीसह मत्स्यपालन व्यवसाय करून आर्थिक मिळकत प्राप्त करू शकतात त्यामुळे शेततळे शेतकऱ्यांना फलदायी असून शासनाने मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी तरतूद करावी सतिश धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य.
गेले काही वर्षापासून शेतीच्या विकासासाठी कृषी व तत्सम विभागाकडून मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जात आहेत. मागेल त्याला शेततळे यांमुळे दुष्काळी भागाला जलसंजीवनी मिळाली आहे. दरम्यान चालू वर्षी शेततळे उभारणीसाठी करावयाच्या प्रक्रियेला अद्याप शासनाकडून निर्देश मिळाले नाहीत. विजयकुमार राऊत. जिल्हा कृषी अधिक्षक, सातारा