
स्थैर्य, दि.१८: राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे सध्या संकट ओढावलेले आहे. बळीराजा नेहमीच कधी अती पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ यांमुळे अडचणीत असतो. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारेृ नेहमीच कर्जमाफीची लोकप्रिय घोषणा करतात. मात्र प्रत्यक्षात त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होतो हे अनुत्तरीतच राहते. दरम्यान आता एका शेतकऱ्याने कर्जमाफी मिळाली नसल्याने उद्विग्न होऊन यापूर्वीच्या फडणवीस आणि आत्ताच्या ठाकरे सरकारचे पोस्टर लावत वाभाडे काढले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील अल्पभूधारक शेतकरी नीलकंठ लिप्ते यांनी आपल्या शेतातील बांधावा लावलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नीलकंठ हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांची भिलखेड येथे दोन एकर जमिन आहे. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र संग्रामपूर शाखेचे 2011 पासून एक लाख 48 हजारांचे कर्ज आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला. यावेळीही ठाकरे सरकारच्या काळातही त्यांनी अर्ज केला. मात्र दोन्हीही सरकारच्या काळात कर्जमाफी मिळालेली नाही. यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन आपल्या शेतातील बांधावर मोठे पोस्टरच लावले लावला आहे.
हे पोस्टर लावत त्यांनी त्यावर ‘फसवी कर्जमाफी’ असे लिहित माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो छापले आहेत. ‘या दोन्ही सरकारच्या कालावधीत माझी कर्जमाफी झालीच नाही, त्यामुळे मी एक त्रस्त शेतकरी’ असा संदेश त्यांनी लिहिला आहे. यासोबतच यावर त्यांचे नाव, पत्ता आणि फोन नंबरही लिहिण्यात आला आहे.