स्थैर्य,मुंबई, दि २२: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होमार, असा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात आहे. दरम्यान, ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नसल्यामुळे परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा झाली. यावेळी बोर्डाच्या सहसचिवांनी परीक्षा परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नसल्याचे सांगितले. त्यामुळे या परीक्षा ऑइलाईन होणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित मानले जात आहे. याशिवाय, ऑनलाईन परीक्षा घेतली, तर ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीचा विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. अशा परिस्थितीमुळे ऑफलाईनच परीक्षा घेण्यावर सर्वांचा भर आहे.
असे आहे परीक्षांचे वेळापत्रक
काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर, 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.