सोशल मीडियाचा सकारात्मक वापर; ‘फूडी स्वॅगर’च्या वृषाल भोसलेंनी आगग्रस्त कुटुंबाला मिळवून दिला आधार

मित्रपरिवार आणि फॉलोअर्सना केले मदतीचे आवाहन; जमा झालेल्या निधीतून संसारोपयोगी वस्तूंची मदत


स्थैर्य, बारामती, दि. १६ ऑगस्ट : बारामती तालुक्यातील कानाडवाडी-चोपडज येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एका शेतकरी कुटुंबाला ‘फूडी स्वॅगर’ या सोशल मीडिया चॅनलचे वृषाल भोसले आणि योगेन्द्र भोसले यांनी मदतीचा हात दिला आहे. सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन करून, जमा झालेल्या निधीतून त्यांनी या कुटुंबाला पुन्हा उभे राहण्यासाठी आधार दिला आहे.

काही दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत या शेतकरी कुटुंबाचे घर, अन्नधान्य आणि शालेय साहित्यासह सर्वस्व जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळताच, वृषाल आणि योगेन्द्र भोसले यांनी या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली आणि आपल्या ‘फूडी स्वॅगर’ या इंस्टाग्राम व यूट्यूब चॅनलवरून मित्र व फॉलोअर्सना मदतीचे आवाहन केले.

या आवाहनाला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर, जमा झालेल्या निधीतून कुटुंबासाठी घरगुती वस्तू, किराणा सामान, कपडे आणि शालेय साहित्य खरेदी करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले.

सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठीच नव्हे, तर सामाजिक कार्यासाठीही प्रभावीपणे करता येतो, हाच संदेश या प्रेरणादायी उपक्रमातून मिळाला आहे.


Back to top button
Don`t copy text!