![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2023/02/-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95-1-jpg.webp?resize=780%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य । दि. ०४ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । राज्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मानधन वाढ, पूर्ण वेळ काम याबरोबरच इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
मंत्रालयात ग्रामरोजगार सेवकांच्या समस्यांविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, रोहयोचे वरीष्ठ अधिकारी, यांच्यासह ग्रामरोजगार सेवकांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
मंत्री श्री भुमरे म्हणाले, ग्रामरोजगार सेवकांचे मानधन ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात येते. त्यांच्याकडून विलंब झाल्यास १५ दिवसांत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठीची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मानधनाबाबत अन्य राज्यातील कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मनरेगा’ योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम ग्रामरोजगार सेवकांनी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना सक्षम करण्यासाठी आणि न्याय मागण्यांसाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी यावेळी सांगितले.