स्थैर्य, सातारा, दि. 7 : संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या येथील दि रयत सेवक को-ऑप. बँक लि., सातारा बँकेच्या चेअरमनपदी पोपटराव सर्जेराव पवार व व्हाईस चेअरमनपदी लालासाहेब नारायणराव खलाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बँकेच्या संचालक मंडळाची 2020-21 मधील 6 वी सभा छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे अध्यासी अधिकारी सहाय्यक निबंधक, अधीन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा श्रीमती पी. के. काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत या सदर निवडी जाहीर करण्यात आल्या.
पोपटराव पवार हे गोटे, ता. कराड येथील रहिवासी असून ते सध्या यशवंत हायस्कूल, कराड येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. लालासाहेब खलाटे हे डी. पी. रोड, माळवाळी, हडपसर-पुणे येथील रहिवासी असून ते सध्या साधना विद्यालय, हडपसर-पुणे येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा ही महाराष्ट्रातील पगारदार नोकरांच्या बँकांमधील अग्रेसर बँक आहे. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून बँकेच्या एकूण 20 शाखा आहेत. दि. 31 मार्च 2020 अखेर बँकेचे सभासद 11 हजार 121 इतके आहेत. बँकेच्या एकूण ठेवी 1 हजार 143.20 कोटी आहेत. बँकेने 717.08 कोटी कर्जवाटप केले आहे. बँकेस 2019-20 मध्ये 9 कोटी 99 लाख 25 हजार नफा झाला आहे.
सत्कारास उत्तर देताना बँकेचे नूतन चेअरमन पोपटराव पवार यांनी सर्व संचालक मंडळ व संस्था पदाधिकारी यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. नूतन व्हाईस चेअरमन लालासाहेब खलाटे यांनी रयत शिक्षण संस्थेचे सचिव यांचे यापुढेही असेच मार्गदर्शन मिळत राहो, अशी आशा व्यक्त केली. अध्यासी अधिकारी यांनी रयत षिक्षण संस्थेबद्दल आदर व्यक्त करून बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावेत व सहकार वाढवावा, असे मत व्यक्त केले. संचालक रामदास तांबे यांनी आभार मानले.
या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल अजित पवार, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आ. चेतन तुपे, चेअरमन डॉ. अनिल पाटील, माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्या सरोज पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अॅड. रवींद्र पवार, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्रिं. डॉ. विठ्ठल शिवणकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिं. डॉ. प्रतिभा गायकवाड, माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, रयत शिक्षण संस्थेचे इतर विभागीय अधिकारी, आजी- माजी पदाधिकारी, बँकेचे सभासद, ठेवीदार, बँक सेवक, सेवक संघटना, पदाधिकारी व विविध स्तरातील हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी बँकेचे संचालक रामदास तांबे, विजयकुमार डुरे, अर्जुन मलगुंडे, संचालिका सौ. सुनीता वाबळे, संचालक बाबासाहेब शेख, प्रमोद कोळी, डॉ. विजय कुंभार, शहाजी मखरे, जंबूकुमार आडमुठे, सुखदेव काळे, सुभाष पाटील, राजेंद्र शिंदे, डॉ. बिरू राजगे, संचालिका सौ. नीलिमा कदम, बँकेचे जनरल मॅनेजर संजयकुमार मगदूम, सभासद व सेवक उपस्थित होते.