दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । फलटण शहरातील विशेषतः मलठण येथील पालखी महामार्ग व अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. सत्ताधारी मंडळींनी मुद्दामून मलठणला विकासापासून वंचित ठेवलेले आहे. आगामी आठ दिवसामध्ये जर मलठण येथील रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी फलटण नगरपालिकेने जर ठोस पावले उचलेले नाहीत तर आम्ही माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन पुकारू, असा इशारा माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिला आहे.
मलठण येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. समशेरसिंह नाईक निंबाळकर, अशोक जयवंत जाधव, मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ. मिना कृष्णात नेवसे, सौ. मदलसा संभाजी कुंभार, सचिन रमेश अहिवळे यांनी फलटण नगरपरिषदेस लेखी निवेदन दिलेले आहे.
निव्वळ राजकीय हेतूने मलठण परिसराला सत्ताधाऱ्यांनी विकासापासून वंचित ठेवले जात आहे. मलठण येथील नागरिक वेळेवर मालमत्ता कर भरणा नगरपरिषदेस करत असतानाही जाणिवपूर्वक त्यांचेवर अन्याय केला जात आहे. कर भरणा केल्यानंतर नागरिकांना सोयी सुविधा मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. मलठण येथील नागरिकांना नेहमीच सापत्नभावाची वागणूक जाणिवपूर्वक दिली जात आहे. दि. 9 फेब्रुवारी पर्यंत याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आम्ही नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन पुकारणार आहे. याबाबत लवकरात लवकर ठोस पावले उचलण्यात यावे अन्यथा आंदोलन सामोरे जावे लागेल असेही यावेळी अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.