
दैनिक स्थैर्य | दि. 25 फेब्रुवारी 2025 | फलटण | येथील श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलात झायटेक्स बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई, आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणात डॉ. विनय सुपे (माजी विभाग प्रमुख, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी), प्रकाश कुलकर्णी (तांत्रिक सल्लागार, झायटेक्स बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई) यांच्यासह प्रमुख व्यक्तींनी सहभाग घेतला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून डाळिंब पिकाच्या उत्पादनात जमिन आरोग्य व्यवस्थापनाचे महत्व पटवून देण्यात आले.
प्रशिक्षणाची सुरुवात दिप प्रज्वलनाने व मान्यवारांचा सत्कार करून करण्यात आली. प्रकाश कुलकर्णी यांनी प्रशिक्षणाचे महत्व, कंपनीचे उदिष्ट, आणि डाळिंब पिकातील पोषण व संरक्षण याबद्दल माहिती दिली. डॉ. विनय सुपे यांनी आंबिया बहार व्यवस्थापन, एकत्मिक नत्र व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कर्ब व नत्र व्यवस्थापन, छाटणी व पाणी व्यवस्थापन, फुटवे व्यवस्थापन, जमीन आरोग्य व जिवाणू व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले.
डॉ. सानिका जोशी यांनी डाळिंब पिकातील कीड समस्या, मावा, तुडतुडे, रस शोषणारी कीड व्यवस्थापन, मर रोग लक्षणे व व्यवस्थापन, सूत्रकृमी व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. शहाजी शिंदे यांनी कृषि विभागाच्या योजनांबद्दल माहिती दिली.
डाळिंब पिकाच्या उत्पादनात जमिन आरोग्य व्यवस्थापनाचा महत्वाचा वाटा आहे. या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आवश्यक ती माहिती मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.