यावर रामराजे म्हणाले की, मी २० व्या वर्षी क्रिकेट सोडले. मी रणजी ट्रॉफीच्या उंबरठ्यावर होतो. महाराष्ट्राच्या पहिल्या २२ मध्ये माझे नाव असायचे. त्यानंतर माझे उजव्या पायाचे हाड तुटले. त्याचे ऑपरेशन झाले, परत खेळलो, परत तुटले आणि मग मी क्रिकेट सोडून दिले. माझ्या क्रिकेटचा आणि राजकारणाचा काही संबंध आला नाही. मी सिम्बायसीस लॉ कॉलेजला प्रोफेसर होतो. मी बर्याच केसेस चालवल्या आहेत, फौजदारी चालवली आहे. परंतु माझे मन त्यात काही रमत नव्हते. शिकवणीत माझे मन रमत होते. परंतु वैयक्तिक कारणामुळे ७७-७८ ला मी फलटणला गेलो. माझी आई वारली. शेतीसह घरातले जे प्रॉब्लेम होते, ते सोडवत बसलो. माझे चुलते शिवाजीराजे व विजयसिंह यांनी आमचे चुलत भाऊ संजीवराजे व रघुनाथराजे व अजित आम्हा सर्वांना एकत्र आणले व म्हणाले की, आम्ही थकलोय, तुम्हाला जर राजकारण पुढे करायचे असेल तर या या पद्धतीने करावे लागेल आणि त्यातून मी राजकारणात ओढला गेलो. त्यानंतर मी नगरपालिकेचा नगराध्यक्ष झालो. त्याच्यानंतर आमदार झालो, त्यानंतर मंत्री झालो व नंतर सभापती झालो. हा काही नियोजनबद्ध किंवा अॅम्बिशनला धरून झालेला प्रवास नाही, हा केवळ योगायोग आहे, माझ्या नशिबात लिहिलेलं असेल. पण, आज एक समाधान आहे की, आपल्या हातून ८१ टीएमसी पाणी कृष्णेचे वाचलेलं आहे. त्याच्याहून मोठं काम काय असू शकतं. शेवटी पदालाही काही मर्यादा आहेत. लोकशाहीमध्ये सरकारला पाच वर्षात काय करता येईल, यालाही ६० वर्षात मर्यादा झालेली आहे. शेवटी काही पॉलिसींवर जर एकमत झालं तर देश, राज्य पुढे जाणार आहे. दुर्दैवाने ते होत नाही. एकमेकाविरोधात चढाओढ, बोलणं याच्यापलीकडे आता राजकारण दिसत नाही.
माझ्या आयुष्यात मला जे करायचे होते, ते करायला मिळालेलं नाही आणि ज्याचा मी विचार केला नाही त्याच्यापेक्षा अधिक चांगलं झालेलं आहे. मात्र, त्याचा फायदा बर्यापैकी सर्वसामान्य माणसाला झालेला आहे. खटाव तालुक्यात जे तारळीचं पाणी येत आहे, उरमोडीचं पाणी येत आहे, ते केवळ कृष्णा महामंडळामुळेच सुरू झालेलं आहे. नाहीतर ही धरणं झालीच नसती. कै. अभयसिंहराजे भोसले यांनी परवानगी दिली नसती तर माण-खटावला पाणी येऊ शकत नव्हतं. ही सगळी मंडळी नशिबवान आहेत. लोकशाहीत हे चालते. भूमिपूजन एक करतो, उद्घाटन दुसरा करतो. माझं तरुण पिढीला एकच सांगणे आहे की, तुम्ही राजकारण करा, धर्माचं करा, सेक्युलॅरिझमचं करा, पण विकास करणार्या पार्टीला मतदान करा. विकासाला तुम्ही जर मतदान केले नाही, तर आत्मघात कराल. व्हॉटस्अॅप ग्रुपवर आज जे बघायला मिळत आहे, ते निराशाजनक आहे. आजच्या तरुण पिढीला पाण्याचे प्रश्न माहीत आहेत का? त्यांना ‘लवाद’ माहीत आहे का? हे कोण वाचत नाही, आमच्यासारखे लोक बोलत नाहीत. आमच्याकडूनही चुकत गेलेले आहे, हे मी मान्य करतो. आमचे पूर्वज काय करत होते, म्हणजे १९४८ पासून राजकीय संस्कृती या देशात आणि राज्यात होती, त्याचे फायदे-तोटे काय होते, हे आम्ही सांगायला कमी पडलो. सत्तेत जास्त गुरफटलो आणि मग सत्तेत गुरफटल्यानंतर कुठलंच राजकीय तत्व जर राहिलं नसेल तर ह्या चुका आमच्या आहेत. आम्ही आमची कामे बोललोच नाही, जनतेपर्यंत ती पोहोचवलीच नाहीत. आता तुम्हाला जन्मजातच लाईट दिसतीय, आमच्या वेळेला लहानपणी अंधार होता. हा अंधार होता, हे सांगायला आम्ही कमी पडलो. आमच्या वेळेला ग्रामोफोन होता, रेडिओ होता. आता तुमच्याकडे मोबाईल आहे. आता व्हॉटस् ग्रुप जर जातीवर व्हायला लागले तर डेमोक्रसी कशी टिकेल? हे सगळे चुकीच्या दिशेने चाललेले आहे. मी तर ७२ साली ‘एल.एल.एम.’ होतो. मी इंटरनॅशनल लॉ मध्ये एल.एल.एम. केले होते. मी जर राजकारणात पडलो नसतो, तर मी कुठे गेलो असतो, हे सांगा. या गोष्टीचा मला मनस्ताप होतो. हा विषय नको, माझी आता ७५ वी होणार आहे, मला वादात आता पडायचे नाही. आमच्या भागावर जे खासदाररूपी संकट आले आहे, ते संपवायचे हे माझे आता शेवटचे काम राहिलेले आहे, एवढं बाकी नक्की!
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘बोल भिडू’ या ‘यू ट्युब’ चॅनलला नुकतीच आपली मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या राजकारणाचा लेखा-जोखा मांडला. या मुलाखतीत त्यांनी आपण फक्त आजवर पाण्यासाठीच राजकारण केल्याचे सांगितले. आपले विरोधक आपल्यावर आज जे आरोप करीत आहेत, ते फक्त स्वार्थासाठीच करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात आज जे बागायत क्षेत्र म्हणजे उसाचे मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे पीक व या पट्ट्यात चालणारे चार साखर कारखाने हे मी आणलेल्या पाण्यामुळेच उभे राहिले आहेत, असे ठासून सांगितले. त्यांच्या मुलाखतीचा घेतलेला आढावा…